Bob Cowper – कसोटीमध्ये ऐतिहासिक त्रिशतक ठोकणाऱ्या दिग्गजाचं निधन, क्रिकेट जगतात शोककळा

क्रिकेट जगतातून एक दु:खद बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू बॉब कूपर यांचे दीर्घ आजाराने मेलबर्नमध्ये निधन झाले आहे. रविवारी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या बातमीला दुजोरा दिला आहे. कूपर यांच्या पश्चात पत्नी डेल आणि दोन मुली ओलिव्हिया आणि सेरा आहेत.

बॉब कूपर हे डावखुरे फलंदाज होते. अचूक टायमिंग आणि संयमी फलंदाजी ही त्यांची खास ओळख होती. फेब्रुवारी 1966 साली त्यांनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली होती. जवळपास 12 तास त्यांनी मैदानावर शड्डू ठोकत 589 चेंडूत 307 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही फलंदाजाने ठोकलेले हे पहिले त्रिशतक होते.

बॉब कूपर यांचे हे तिसरे शतक होते. याआधी त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये दोन शतके ठोकली होती. त्यानंतरही त्यांनी आणखी दोन शतके ठोकली. 1968 मध्ये त्यांनी अचानक निवृत्ती घेतली होती. त्यावेळी ते फक्त 28 वर्षांचे होते.

बॉब कूपर यांनी 1964 ते 1968 या काळात ऑस्ट्रेलियाकडून 27 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 46.84 च्या सरासीरने 2061 धावा केल्या. यात त्यांच्या 5 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीही त्यांनी 36 विकेट्स घेतल्या होत्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यांच्या बॅटची जादू चालली. कूपर यांनी प्रथम श्रेणीच्या 147 सामन्यात 10,5095 धावा केल्या. कूपर यांना 2013 मध्ये त्यांच्या क्रिकेटमधील सेवेबद्दल ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले होते.