दिल्ली डायरी – भाजप अध्यक्षपदाची निवड पुन्हा लांबणीवर!

>> नीलेश कुलकर्णी

‘ऑपरेशन सिंदूर’ होण्यापूर्वी भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नेमणुकीवरून अंतर्गत ‘गृहयुद्ध’ भडकले होते. नवा पक्षाध्यक्ष संघाच्या मर्जीतलाच होणार असेच चित्र तयार झाले होते. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सगळी समीकरणे बदलली आहेत. ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याने यशस्वी केले असले तरी त्याचे राजकीय श्रेय देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी घेतीलच. अशा स्थितीत भाजपच्या अध्यक्षपदाचा पाळणा लांबणीवरच गेल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे गेला आहे. त्यासाठी आता ऑपरेशन सिंदूर हे कारण ठरले असले तरी भाजपमधील संघटनात्मक गोष्टीही त्यातील अडथळा ठरल्या आहेत. मुळात भाजपच्या संघटनात्मक निवडणुकाच अनेक राज्यांत झालेल्या नाहीत. गेल्या अकरा वर्षांपासून भाजप निर्विवादपणे सत्तेत आहे. त्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य पक्ष संघटनेत आले आहे. दस्तरखुद्द पंतप्रधानांनी यासंदर्भात मध्यंतरी भाजपच्या महासचिवांची कानउघाडणी केली होती. मात्र परिस्थिती बदललेली नाही. मोदींच्याच गुजरातमध्ये पेंद्रात मंत्री असणारे सी. आर. पाटील अध्यक्षपदाची मुदत संपून वर्ष होऊन गेले तरी त्याच पदावर आहेत. गेल्या दीड वर्षापासून मुदत संपूनही जगतप्रकाश नड्डा अध्यक्षपदाची खुर्चीवर आहेत. ‘एक व्यक्ती एक पद’ याची जपमाळ भाजप ओढत असते. 2019 मध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँगेसमध्ये सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष नेमण्यात आले होते. त्यानंतर पुढील अध्यक्ष निवडायला काँगेसला तीन वर्षे लागली. त्या वेळी भाजपने काँगेसवर टीका केली होती. मात्र आता भाजपचेही तेच झाले आहे.

ऑपरेशन सिंदूरपूर्वी ‘दिल्ली’ व ‘नागपूर’मध्ये गृहयुद्ध भडकले होते. ‘भाजपला आता संघाची गरज राहिलेली नाही’ हे मातृसंस्थेबद्दल जे. पी. नड्डा यांनी केलेले वक्तव्य नागपूरकरांच्या भलतेच जिव्हारी लागले होते. ही भळभळती जखम घेऊनच संघाने ऐन लोकसभा निवडणुकीत दांडपट्टा फिरवला आणि मोदींचा बहुमताचा अश्व यमुनातीरीच अडखळला. मोदींचे खासमखास हेच एकमेव भांडवल असलेले नड्डा अध्यक्षपदी नकोच नको, असा आदेश नागपूरवरून आल्यानंतर नव्या अध्यक्षाच्या नावाची शोधाशोध सुरू झाली. नड्डा यांच्यासारखाच एखादा सांगकाम्या अध्यक्ष असावा म्हणून दिल्लीकरांनी मनोहरलाल खट्टर यांचे नाव पुढे केले. त्यावर फुली मारत नागपूरकरांनी शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह, संजय जोशी, वसुंधराराजे ही नावे सुचविली. मोदींच्या रेशीमबागेतील भेटीत रिटायरमेंट प्लान त्यांना सांगितला गेला. या चार-पाच नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होईल, असे वाटत असतानाच पहलगाम घडले आणि सगळीच चव्रे उलटी फिरली. निमित्त पहलगामचे असले तरी संघटनात्मक फेरबदल राज्यांमध्येच धडपणे झालेले नसल्याने भाजप अध्यक्षपदाची निवड रखडली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक राज्यात भाजपमध्ये अंतर्गत भांडणे सुरू आहेत. त्यामुळे मतैक्य होऊ शकलेले नाही. दहा वर्षांच्या निरंकुश सत्तेनंतर कोणत्याही राजकीय पक्षात शैथिल्य व बेशिस्त येणे स्वाभाविक आहे. मात्र भाजपसारख्या शिस्तबद्ध असल्याचा दावा करणाऱया पक्षाला ते परवडणारे नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भाजपची झाकली मूठ सवा लाखाची ठरली आहे. आता युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरच भाजपच्या घरातून पाळणा हलल्याची बातमी येईल. तोपर्यंत वाट पाहावी लागेल.

मोदी सरकारची ‘सालगिरह’

कोणत्याही आणि कसल्याही गोष्टींचे इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदींचा हात कोणी धरू शकणार नाही. मोदींचे सरकार हे ‘इव्हेंट सरकार’ आहे अशी टीका विरोधक करतात ते काही उगाच नाही. नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱयांदा शपथ घेतली ती 9 मे 2024 या दिवशी. आता मोदींच्या तिसऱया टर्मला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत एका भव्यदिव्य इव्हेंटचे आयोजन सरकारने केले होते. मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे सगळीच समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या सालगिरहवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. मोदींच्या तिसऱया टर्ममध्ये त्यांनी काय केले हे खरे तर सांगण्यासाठी काहीच नव्हते. मात्र आता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने देशभक्तीच्या लाटेवर स्वार होत मोदी सरकार हाच इव्हेंट वातावरण निवळल्यानंतर करू शकते.

थरूर, पवन कल्याण आणि कफाची गोळी

राजकीय नेते हे गोळ्या (फुकटची आश्वासने) देण्यात माहीर असतात. पंतप्रधान मोदी तर याबाबतीत सगळ्यांचे महागुरू ठरावेत. नरेंद्र मोदींनी नुकताच दक्षिण हिंदुस्थानचा दौरा केला. त्यात त्यांनी केलेल्या काही पृती हा सगळ्यांसाठी चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. मोदी सार्वजनिक कार्यक्रमात कोणा राजकीय व्यक्तीशी फारशी जवळीक दाखवत नाहीत. मोदींच्या पॅमेऱयाच्या आड कोणी आला तर त्याची खैर नसते. मात्र मोदींचे एकदम सौम्य रूप केरळ व आंध्र प्रदेशच्या दौऱयात पाहायला मिळाले. केरळच्या दौऱयात मोदींनी एकेकाळी ज्यांच्यावर ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ अशी शेलक्या भाषेत टीका केली होती त्या शशी थरूर यांच्याशी अगदी प्रेमाने हस्तांदोलन केले. सध्या थरूर महाशयांनी मोदींची परराष्ट्र धोरणावरून स्तुती आरंभली आहे. त्यामागचे कारण म्हणजे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचे मानगुटीवर बसलेले भूत आणि काँगेसमध्ये होत असलेली उपेक्षा. ‘‘मला केरळच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करा,’’ या थरूर यांच्या मागणीला काँगेस हायकमांडने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे थरूर अस्वस्थ आहेत. ते लवकरच भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. त्यामुळे मोदी थरूर यांच्याशी प्रेमभावाने वागत आहेत हे उघड आहे. दुसऱया एका आंध्रातील कार्यक्रमात तिथले उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना भाषण करताना ठसका लागला. एरवी मित्रपक्षांची वाट लावणाऱया मोदींना पवन कल्याण यांच्याबद्दल कमालीचे प्रेम दाटून आले. कल्याण भाषण संपवून बसल्यावर मोदींनी त्यांना बोलावून स्वतः जवळची कफावरची गोळी खायला दिली. चंद्राबाबू नायडूंचे चिरंजीव नारा लोकेश याच्याही पाठीवर मोदींनी थाप मारून ‘दिल्ली मिलने फॅमिली के साथ आना’, असे आमंत्रण दिले. एरवी मोदी हे सगळ्यांशी ‘सुरक्षित अंतर’ राखून वागतात. त्यांच्या आसपास पॅमेऱयात कोणी आलेले त्यांना आवडत नाही. मात्र दक्षिण भारताच्या दौऱयात मोदींच्या स्वभावात असा आकस्मिक बदल झाला तरी कसा? याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मोदी पुठलीही गोष्ट विनाकारण करत नाहीत. त्यांचा तसा इतिहास आहे. पवन कल्याण यांना दिलेल्या कफावरच्या गोळीने कोणाचा ‘कफ’ ठीक होतो आणि कोणाला ‘ठसका’ लागतो ते दिसेलच!