
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी जाहीर केली होती. शस्त्रसंधीची माहिती जाहीर केल्यापासून त्यांना मोदी समर्थकांकडून सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येत आहे. ट्रॉलर्सच्या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी त्यांचं X अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे. यातच आता मिसरी यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत ही मागणी केली आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, “पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. पण त्यांनी शस्त्रसंधीची माहिती देताच चवताळून पिसाळल्यागत उठलेल्या भक्तमंडळींकडून मिसरी आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांबाबत करण्यात येत असलेली आक्षेपार्ह टिप्पणी अत्यंत संतापजनक आहे. वास्तविक शस्त्रसंधीचा निर्णय हा प्रशासनात काम करणाऱ्या मिसरी यांचा नाही तर राजकीय पातळीवर सरकारकडून घेतला गेला. तो केवळ जाहीर करण्याची जबाबदारी मिसरी यांच्यावर होती.”
ते म्हणाले, “आपल्याच नेत्याविरोधात बोलण्याची वेळ येताच नांगी टाकणारे हे ट्रोलर्स मिसरी आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करतायेत. मिसरी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची होऊ नये यासाठी या ‘अंधभक्त’ ट्रोलर्स आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या मेंदूवर सरकारने कठोर कारवाई करावी. ही बाब सरकारपर्यंत पोचली की नाही माहित नाही, पण सरकारपर्यंत पोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ट्रोलर्सवर नक्की कठोर कारवाई करतील, असा विश्वास आहे.”
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. पण त्यांनी शस्त्रसंधीची माहिती देताच चवताळून पिसाळल्यागत उठलेल्या ‘भक्त’मंडळींकडून मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांबाबत करण्यात येत असलेली आक्षेपार्ह… pic.twitter.com/OYUQmnQR5x
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 12, 2025