
>> प्रभाकर पवार, [email protected]
मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी कश्मीरमधील पहलगाम येथे सहकुटुंब सुट्टीचा आनंद लुटावयास गेलेल्या 26 पर्यटकांना धर्म विचारून पाकिस्तानी अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार मारले. त्यात नौदल, हवाई दल व केंद्रीय द्रीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी मंगळवारीच (6 व 7 मेच्या रात्री) पाकिस्तानवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे 9 ट्रेनिंग कॅम्प क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त केले. त्या वेळी 100 च्या वर अतिरेकी मारले गेले. मृतांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर या अतिरेक्याच्या कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे.
दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येणारे बहावलपूर, सियालकोट, मरकझ तोयबा आदी 9 ट्रेनिंग कॅम्प नेस्तनाबूत झाल्यावर खवळलेल्या पाकिस्तानने कश्मीर सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दीड डझन निरपराध्यांना व 5 लष्करी अधिकारी आणि जवानांना ठार मारले पाकिस्तानच्या या क्रौर्याला भारताने जशास तसे उत्तर दिले. पाकचे लष्करी विमानतळ तसेच ड्रोन हवेतच नाकाम केले. 35-40 पाक जवानांना कंठस्नान घातले भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते करण्याच्या तयारीत असतानाच भारताने कच खाल्ली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेमात पडून भारताने सिंदूर मोहीम अर्धवट सोडली शनिवारी सायंकाळी संघर्ष विरामाची घोषणा केली. तिथेच घात झाला. पाकिस्तान मरता मरता वाचला. भारताने इतिहासकालीन महायोद्धा पृथ्वीराज चौहानप्रमाणे पाकिस्तान नावाच्या सुलतान मोहम्मद घोरीला अभय दिले. तोच मोहम्मद घोरी दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज चौहानच्या मुळावर आला. घोरीने पृथ्वीराज चौहानला जिवंत सोडले नाही. पृथ्वीराज चौहानने शरणागती पत्करलेल्या मोहम्मद घोरीला जागीच ठार मारले असते तर कदाचित पुढचा इतिहास बदलला असता. आताही पाकिस्तानचा जवळजवळ ताबा घेतलेल्या भारताने शत्रसंधीची घोषणा जर केली नसती, तर पाकिस्तान या जगाच्या नकाशातून बेदखल झाला असता. मात्र भारताने ती संधी गमावली असे माजी लष्करी अधिकारी उघडपणे बोलत आहेत.
पाकिस्तान 1947-48 पासून कश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतावर हल्ले करीत आहे. भारताचे ब्रिटनमधील राजदूत (Diplomat) रवीद्र हरेश्वर म्हात्रे (48) यांचे 1984 साली ब्रिटनमधील बर्मिंगहॅममधून पाकिस्तानच्या (आयएसआय) इशाऱ्यावरून कश्मीरचा राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकबुल बट (43) याने अपहरण घडवून आणले. त्यानंतर म्हात्रे यांची तीन दिवसांनी हत्या करण्यात आली. मकबूल बटला अटक करून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली, परंतु म्हात्रे यांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार पहलगामप्रमाणे काही सापडले नाहीत. आझाद कश्मीर व इतर मागण्यांसाठी जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेने म्हात्रेची हत्या घडवून आणली, तर पहलगाम हत्याकांड टीआरएफ या अतिरेकी संघटनेने घडवून आणले. यामागे आयएसआयचा एकेकाळचा बॉस व सध्याचा पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसीम मुनीर हा आहे. पहलगाम हत्याकांडानंतर कश्मीरसह साऱ्या भारतात जातीय दंगली उसळतील व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आसीम मुनीरला वाटले होते. परंतु त्याचा हा डाव फसला. उलट भारतापुढे लोटांगण घालायची वेळ पाकिस्तानवर आली. हिंदू-मुस्लिम दंगली घडवून भारतात अराजक माजविण्याचा पाकिस्तानचा गेल्या ७ दशकांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु भारतीय मुस्लिमानांच पुन्हा हिंदू-मुस्लिम फाळणी नको आहे.
कश्मीरात रक्तपात घडविणाऱ्या, कश्मिरी पंडितांच्या खुलेआम कत्तली करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी मकबुल बटला फाशी दिल्यानंतर मुंबई शहरात बॉम्बस्फोट सुरू केले. 11 सप्टेंबर 1989 रोजी अंधेरीच्या गुरुनानक इमारतीसमोर पहिला बॉम्बस्फोट घडविण्यात आला, परंतु जीवितहानी झाली नाही. 1 जानेवारी 1990 रोजी नायगाव येथील पोलिसांच्या परेड राऊंडवर घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. तेथून मुंबईत जे बॉम्बस्फोट सत्र सुरू झाले ते काही थांबले नाही. 1990 ते 26/11 पर्यंत पाकिस्तानी अतिरेक्यांनी आग्रीपाड्याचा डॉ. जलीस अन्सारी, भिवंडीचा साकीब नाचन आदी कितीतरी स्थानिक गद्दारांच्या मदतीने मुंबईत 100 च्या वर बॉम्बस्फोट घडवून आणले व 500 च्या वर निरपराध्यांचे बळी घेतले आहेत.
1992-93 च्या दंगलीनंतर मुंबईतील 40 च्या वर मुस्लिम तरुणांना पाकिस्तानी लष्कराने अतिरेकी कारवायांचे पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते (भारतीय सैन्यांनी नुकत्याच उद्ध्वस्त केलेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये) भारतातील बहकलेल्या मुस्लिम तरुणांना पाकिस्तानात ट्रेनिंग द्यायचे व घातपाती कारवाया करण्यासाठी पुन्हा भारतात पाठवायचे सत्र 1992-93 पासून अगदी काल-परवापर्यंत सुरू होते. भारताच्या तिन्ही दलांच्या सैन्यांनी पाकिस्तानातील बहुसंख्य ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे भारतातील अतिरेकी कारवाया थांबतील असा कयास करण्यात येत आहे. परंतु जाणकारांच्या मते हा अंदाज फोल ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तान कधीही शांत बसणार नाही. भारताविरुद्ध पाकिस्तान कायम कट-कारस्थाने करीतच राहणार आहे. आसीफ मुनीर हा कट्टरपंथी अतिरेकी जोपर्यंत पाकिस्तानचा लष्करप्रमुख आहे. तोपर्यंत भारतात शांतता निर्माण होणार नाही. भारताचे मेजर गौरव आर्या (नि.) म्हणतात तेच खरे आहे. जब तक आसीफ मुनीर का हात, पैर, सर कटवा नहीं जाता, तब तक भारत को शांती नहीं मिलेगी.
आपल्या देशात आसीफ मुनीरच्या आयएसआयची पाळंमुळं घट्ट बसलेली आहेत. हे अनेकदा स्पष्ट झालेले आहे आता येथून पुढे रोज बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरविल्या जातील, धमक्या दिल्या जातील, सायबर हल्ले केले जातील. पोलिसांना, नागरिकांना हैराण केले जाईल. जोपर्यंत मुंबईसह भारतातील आयएसआयची मुळं उखडवून टाकली जाणार नाहीत. तोपर्यंत आपल्या देशात शांती नांदणार नाही. भाड्याच्या घरात, मशिदीत पाकचे गुप्तहेर व हस्तक आसरा घेतात आणि घातपाती कारवाया घडवून आणतात गेल्या दोन दशकांत मुंबई क्राईम ब्रँचने 30 च्या वर पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केली आहे. कुलाब्याच्या सुंदरनगरीत मशिदीच्या बाजूला भाड्याच्या घरात राहणाऱ्या आझाद ऊर्फ अली खान ऊर्फ रफीक ऊर्फ सारंग याच्याकडे भारतीय असल्याची खोटी कागदपत्रे सापडली. त्याचे मतदार यादीतही नाव असल्याचे उघड झाले. सारंगसारखे ‘आयएसआय’चे हस्तक मुंबईत पदोपदी आहेत. तेव्हा भारताला खरा धोका पाकिस्तानी हस्तकांना आसरा देणाऱ्या गद्दारांचा आहे. त्यांना प्रथम ठेचले तरच आपल्या देशात शांती लाभेल. अन्यथा 26/11 व पहलगामसारखे हल्ले आणि बॉम्बस्फोट होतच राहतील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सलोखा, एकजूट दाखविली नसती, राजकीय पुढाऱ्यांच्या भडकावू भाषणांना ते बळी पडले असते तर या देशाचे कधीच तुकडे झाले असते.