
टीम इंडियाचा ‘रनमशीन’ विराट कोहली याने सोमवारी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कोहलीने याबाबत माहिती दिली. कोहलीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट जगतालाही धक्का बसला. मात्र हा निर्णय घेण्याआधी पडद्याआड मोठ्या घडामोडी घडल्या. विराटने निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यासह दोघांशी फोनवरून संवाद साधला होता.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय विराट कोहलीने खूप आधीच घेतल्याची चर्चा आहे. आगामी काळात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे त्याला आणि टीम इंडियालाही काही गोष्टी बदलाव्या याची जाणीव विराटला होती. या संक्रमणाच्या काळात कर्णधारपदाची जबाबदारी मिळवून नेतृत्व करण्याची संधीही विराटला होती, मात्र बीसीसीआयची मानसिकता तरुण खेळाडूकडे नेतृत्व देण्याची होती.
सध्याच्या टीम मॅनेजमेंटसोबत काम करताना स्वातंत्र्यही मिळत नव्हते. मागील वेळी अर्थात राहुल द्रविडच्या काळात आणि आता गौतम गंभीरच्या काळात ड्रेसिंग रुममधील वातावरणही वेगळे होते. त्यात विराटचा फॉर्मही खराब होता. त्याने तीन वर्षात 32 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला असावा.
क्रिकबझच्या अहवालानुसार, विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी दोन जणांशी फोनवरून संवाद साधला होता. यापैकी एक म्हणजे टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि दुसरे आताचे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर. विराट आणि आगरकर यांच्यामध्ये दोनदा चर्चा झाली, मात्र याचा परिणाम त्याच्या निर्णयावर झाला नसल्याचे दिसते.
रोहित, विराट वन डे वर्ल्ड कपपर्यंत नसतील, गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य
विराटने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशीही चर्चा केली असावी, मात्र यास दुजोरा मिळालेला नाही. तसेच राजीव शुक्ला यांच्याशीही बैठक होणार होती, पण हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि पुरेसा वेळ न मिळाल्याने ही बैठक झाली नाही.