जंकफूडच्या जाहिराती बघून मुले भूक नसतानाही खातात, संशोधकांनी वाजवली धोक्याची घंटा

टीव्हीवर खाण्यापिण्याच्या – जंकफूडच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात येत असतात. या जाहिराती पाहताना मुले जास्त खातात. बर्गर, चिप्स किंवा साखरयुक्त कोल्ड्रिंगच्या जाहिराती असतील तर त्या मुलांना अधिक प्रमाणात खायला लावू शकतात. लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात एक अभ्यास केला.

पालकांनी काय करावे

  • मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करा आणि कंटेंटचे निरीक्षण करा.
  • बाहेरचे खेळ आणि नियमित व्यायामाला प्रोत्साहन द्या.
  • संतुलित, घरी शिजवलेले जेवण द्या.
  • मुलांना वयानुसार योग्य पोषणयुक्त आहाराची माहिती द्या.

हाय फॅट्स, मीठ आणि साखरयुक्त अन्न किंवा ब्रॅण्ड जाहिरातींचा मुलांच्या खाण्यावर कसा परिणाम होतो, याबाबतचा हा अभ्यास आहे. फक्त पाच मिनिटांच्या जंक फूड जाहिरातींमुळे मुले त्या दिवशी अतिरिक्त 130 कॅलरीजचे सेवन करतात. (दोन पांढऱ्या ब्रेडच्या स्लाईसएवढी कॅलरी) आणि हे प्रमाण वाढत जाते.

स्पेनमधील मलागा येथे सुरू असलेल्या युरोपियन काँग्रेस ऑन ओबेसिटीमध्ये संशोधन सादर करण्यात आले. या अभ्यासात यूकेमधील मर्सीसाइड येथील शाळांमधील 7 ते 15 वयोगटातील 240 मुलांचा समावेश होता. त्यांना दोन वेळा जंक फूड किंवा नॉन-फूड जाहिराती पाच मिनिटांसाठी दाखवण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना द्राक्षे किंवा चॉकलेट असे स्नॅक्स देण्यात आले, त्यानंतर गोड, चविष्ट आणि निरोगी पदार्थांसह दुपारचे जेवण देण्यात आले.

अभ्यासावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, जेव्हा मुलांनी नॉन-फूड जाहिराती पाहिल्या, तेव्हा मुलांनी स्नॅकच्या वेळी 58 आणि दुपारच्या जेवणात 73 कॅलरीज जास्त खाल्ल्या.

  • अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्रोफेसर एम्मा बॉयलँड म्हणाल्या की, ब्रँड- जाहिराती मुलांचे अन्न सेवन वाढवू शकतात हे दर्शविणारे हे पहिले संशोधन आहे. भावनिक प्रतिसादांचे हे उदाहरण आहे. मुलांनी खाद्यपदार्थांच्या जाहिराती मजेशीर, दिलासादायक, परिचयाच्या वाटतात. त्यामुळे भूक नसतानाही नाश्ता करण्याची त्यांची इच्छा होते.
  • लहान मुलांतील लठ्ठपणा हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. अशी मुले टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधे समस्या, आत्मसन्मान गमावणे, दादागिरी करणे आणि नैराश्य यांचा सामना करतो.