
भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने पुरुषाचा मृत्यू झाला. टूनटून कुमार शाह असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर वाहन चालक हा पळून गेला आहे. घडल्या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
रविवारी सायंकाळी वांद्रे पोलिसांचे पथक लाल मट्टी परिसरात गस्त करत होते. तेव्हा त्याना नियंत्रण कक्षातून एक पह्न आला. सागरी सेतूवर अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे पोलिसांना टूनटून कुमार हे जखमी अवस्थेत दिसले.
त्याना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. टूनटून याना भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याचे उघड झाले. अपघात प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पोलीस त्या वाहन चालकाचा शोध घेत आहेत.