
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती उद्भवली होती. यामुळे संपूर्ण देशात तणाव व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. युद्ध छेडल्यास बत्ती गुल करणे, सायरन वाजवणे व सुरक्षेच्या अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याने नागरी संरक्षण दलाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. त्यामुळे हे दल आणखी सक्षम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस बॉईजना साद घालण्यात आली आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नागरी संरक्षण दलाचे महत्त्व समोर आले. नागरिकांना हाय अलर्ट करणे, कशा प्रकारे व कुठे आश्रय घ्यायचा, आपत्कालीन परिस्थिती ओढवलीच तर त्याला कसे सामोरे जायचे हे नागरिकांना सांगण्यासाठी नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना तत्पर ठेवण्यात आले होते. इतकेच नाही तर पंजाब, चंदिगडसारख्या राज्यात असंख्य तरुण-तरुणी नागरी संरक्षण दलात सहभागी होऊन देशसेवा करण्यासाठी पुढे सरसावले होते. एकंदरीत नागरी संरक्षण दल महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याने यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
स्वयंसेवक व्हा…
सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता नागरी सरंक्षण दलाकडून मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस बॉईज तसेच पोलीस कुटुंबातील अन्य सदस्यांनी नागरी सरंक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वयंसेवक म्हणून देशसेवा करण्याची संधी मिळेल असे अधिकाऱयांकडून सांगण्यात येते.
स्ययंसेवकासाठी ही पात्रता गरजेची
वयाची 18 वर्षे पूर्ण असावी, प्राथमिक शिक्षण पूर्ण, हिंदुस्थानचे नागरिकत्व असावे, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल नीरंक असावा, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम असावे.
सुरक्षा यंत्रणांची ताकद वाढेल
पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सदैव सज्ज असतात. पण नागरी संरक्षण दलदेखील अधिक सक्षम झाल्यास सुरक्षा यंत्रणांची ताकद आणखी वाढेल, असे वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात येते.