निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात! सरन्यायाधीशांची आई कमला गवई यांचे स्पष्ट मत

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर तीव्र आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरलं असताना व अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही ईव्हीएम हॅक होऊ शकतं असे निरीक्षण नोंदवले असताना देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमला गवई यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, असे परखड मत नोंदवले आहे. सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसल्यानंतर माझ्या मुलाने काय निर्णय घ्यावा, हे मी कसं सांगणार? पण त्या खुर्चीत बसून तो त्याला योग्य वाटेल तोच निर्णय घेईल याची मला खात्री आहे, असेही कमला गवई म्हणाल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकांनाच केंद्रबिंदू मानलेले आहे. त्या लोकांमधील एक व्यक्ती आणि सामान्य स्त्री म्हणून मी काय मत व्यक्त करणार हे तुम्हाला माहीत आहे. तरीही तुमची इच्छाच असेल तर मला काय वाटते ते मी सांगून टाकते, असे नमूद करत कमला गवई यांनी बॅलेट पेपरचा आग्रह धरला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे केव्हाही चांगलेच आहे. पूर्वी बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या. तशा त्या पुन्हा व्हाव्यात असे मला वाटते, असे आपले स्पष्ट मत कमला गवई यांनी मांडले.

ईव्हीएम सहज हॅक करता येतं; अमेरिकेने केली होती पोलखोल

ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील ईव्हीएम हेराफेरीचे तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक पुरावे दिले. त्यातच ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो, याचे पुरावेच मिळाल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बार्ड यांनी सांगितले होते. त्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असताना कमला गवई यांचे विधान महत्त्वाचे ठरले आहे.