
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या ‘डील’नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका दिला आहे. ‘अॅपल’ची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका. हिंदुस्थानात कारखाने उभारू नका. त्यांचे ते बघून घेतील. त्यांना स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या, असे फर्मानच ट्रम्प यांनी ‘अॅपल’चे सीईओ टीम कुक यांना सोडले आहे. दरम्यान, ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे हिंदुस्थानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
दोहा येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, काल टीम कूक यांच्याशी बोललो, प्रिय मित्रा, आम्ही तुमची खूप काळजी घेत आहोत. तुम्ही 500 अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, परंतु आता मला कळतेय की, तुम्ही हिंदुस्थानात कारखाने बांधत आहात. मला वाटते की, तुम्ही तिथे कारखाने उभारू शकतात, तुम्हाला हिंदुस्थानला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, परंतु हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. हिंदुस्थानने आम्हाला एक प्रस्ताव दिला असून त्यात त्यांनी आपल्या वस्तूंवर कोणताही कर लादणार नाही असे आश्वासन दिले आहे, असे कूक यांना सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. अॅपलने अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून उत्पादन वाढवावे, असे आदेशच ट्रम्प यांनी कूक यांना दिले. आयफोन आणि मॅकबुक्स जगात लोकप्रिय असून आता ते अमेरिकेत उत्पादनाचा विस्तार करतील, असेही त्यांनी नमूद केले.
टीम कूक काय म्हणाले होते?
अमेरिकेत सर्वाधिक विक्री होणारे आयपह्न्स आता हिंदुस्थानात बनतील असे टिम कूक यांनी म्हटले होते. हिंदुस्थानात सध्या अॅपलचे तीन प्रकल्प आहेत. दोन प्रकल्प तामीळनाडू आणि एक कर्नाटकमध्ये सुरू आहे. या कंपन्यांचे संचालन फॉक्सकॉन करत आहे, तर इतर दोन कंपन्या टाटा समूह चालवत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात अॅपलने हिंदुस्थानात तब्बल 22 अब्ज डॉलर मूल्याच्या आयफोन्सची निर्मिती केली, जी त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 60 टक्क्यांहून अधिक आहे.
तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने बांधले, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता तुम्ही हिंदुस्थानात कारखाने उभारताहात, परंतु हिंदुस्थान त्यांचे हित जपू शकतो. त्यांचं बरं चाललंय. तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारा.
ट्रम्प तात्या पलटले… मध्यस्थी नाही, मदत केली!
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविराम मीच घडवून आणला, असे म्हणणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांनी आज परत विधान बदलले. दोन्ही देशांमध्ये मी मध्यस्थी केली नाही, तर तणाव निवळावा म्हणून मदत केली, असे ट्रम्प म्हणाले. युद्ध नको, व्यापार करूया, असा प्रस्ताव मी ठेवला. त्यावर पाकिस्तान समाधानी आहे आणि हिंदुस्थानही खूश आहे. सगळं काही योग्य दिशेने चाललं आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.