अभिप्राय- सुंदर अनुभूती

>> डॉ. मानसी पहाडे

अगदी लहान असताना रानात एकटय़ा पडलेल्या लाकुडतोडय़ाच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानसा सुंदर पक्षी त्या मुलाचा मित्र होतो. तो लहान मुलगा न पाहिलेल्या जगाविषयीची कितीतरी अद्भुत गाणी आणि गोष्टी त्या पक्ष्याकडून ऐकतो. मग त्याला वाटते की, या पाखराला आपल्याजवळ कायमचे का ठेवू नये? तो एक सुंदर पिंजरा बनवतो. पण पिंजरा बघून तो पक्षी एका क्षणात उडून जातो आणि परत कधीच येत नाही. मोठे झाल्यावर आपणही पुष्कळ वेळा लाकुडतोडय़ाच्या त्या लहान मुलासारखे होतो. हातून निसटलेलं बालपण कायमचे जवळ ठेवण्याची आपल्याला तीव्र इच्छा होते. बालपणीच्या अशाच निर्मळ, आनंदी आठवणी घेऊन आलंय ते नेत्रतज्ञ डॉ. कल्पना भांगे यांचे ‘आठवचित्रे’ हे पुस्तक.

‘आठवचित्रे’ या नावामुळे नॉस्टॅल्जिया वाटत असला तरी ते स्मरणरंजना पलीकडे जाणारे हे ललित गद्य आहे.

आपल्या लहानपणाच्या आठवणी या डोळ्यांच्या, कानांच्या, जिभेच्या, नाकाच्या, बोटांच्या आणि हातांच्याही असतात. वाढत्या वयाचा निबरपणा, रुचिहीन बेरंगपणा ओलांडून स्मरणांच्या मुळाशी ज्या आठवणी घेऊन जातात त्या सगळ्या क्षणांची गोष्ट लेखिका सांगते.

आठवचित्रे हे त्यांचे पहिले स्वतंत्र कल्पनेतून साकारलेले पुस्तक.

या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे ती आयएएस अधिकारी आणि सध्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची. त्यात त्यांनी म्हटले आहे, “हे पुस्तक स्वतच्या मनाच्या पोषणासाठी वाचावे. ललित लेखनाचा गोडवा अनुभवण्यासाठी वाचावे. संस्कार होण्याची प्रक्रिया कशी घडते याचा अंदाज घ्यावा. स्वतला आठवावे, रिलेट करावे आताचे विचार आणि कृती यांची बालपणीच्या स्मृतींशी सांधेजोड करावी.’’

या ललित संग्रहात 12 लेख असून त्यात संक्रांत, होळी, रामनवमी, वटपौर्णिमा… अशा वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने लेखिका तिच्या तीव्र स्मरणशक्तीसह बालपण आठवते. त्या संवेदना समृद्ध आठवणींच्या कोंदणातून शब्दरूप घेतात. पुस्तकात येणारे श्रीरामपूर हे तिचे गाव आणि शांता व लक्ष्मी या तिच्या दोन्हीकडच्या आज्या प्रातिनिधिक आहेत.

‘आजीची बाग’ या पहिल्या लेखात झाडे, पाने, फुले यांचे नयनरम्य रंग, आकार असे अनेक संदर्भ जिवंत होऊन येतात.

‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ या लेखात आपल्याला एक नवीन शब्द सापडतो ‘हावरी’. पूर्वीच्या काळी पॉलिश न केलेल्या काळपट तिळाला हावरी म्हटले जाई आणि त्या हावरीपासून लेखिकेच्या आजीने अनेक प्रक्रिया करत बनवलेला तीळगूळ संक्रांतीचा गोडवा वाढवत न्यायचा याचे तपशील येतात. होळी या लेखात छोटय़ा गावात गल्लोगल्ली एकत्र धडाडून पेटणारी होळी, प्रत्येक घरातला पुरणपोळीचा सुग्रास नैवेद्य आणि बोंबाबोंब करत फिरणाऱया मुलांचा व्रात्यपणा लेखिकेला जसाच्या तसा आठवतो.

  रामनवमी या लेखात श्रीरामपूर गावातील काळा-राम, गोरा-राम मंदिरातला रामजन्मोत्सव, तिथे भरणारी मोठी जत्रा आणि त्यासाठी आजूबाजूच्या गावागावातून येणारी माणसे… त्या काळच्या छोटय़ा गावातला एकजिनसीपणा साध्यासुध्या आणि ठसठशीत शब्दात हा ललितलेख उलगडत जातो. जत्रेनंतर उठून जाणाऱया, रंगीत पिसांच्या टोप्या, कठपुतळी, आरसेवाल्यांची, गोल फिरणाऱया पाळण्याची दुकाने उठून जातात, यातून मग आत्मजाणिवेच्या शोधापाशी  हा लेख थांबतो.

साबुदाण्याच्या पापडय़ा, आंब्याचा रस आणि पुरणपोळी, कैरीचे लोणचे यासारखे लेख खाद्यसंस्कृतीच्या उपासकांना आवडतील असेच. या सगळ्या लेखांच्या मुळाशी आहेत, काही सण, काही जागा आणि काही घरगुती खरपूस वास… एखादा छोटा मुद्दा घेऊन पापुद्रा उलगडावा तशा लेखिकेच्या आठवणी उलगडत राहतात आणि तिच्या अनलंकृत शैलीत त्या आपल्याला स्वतच्या आठवणीत रमायला लावतात.

अनुभवी आणि व्यासंगी चित्र कलाकार सुबोध पाध्ये यांची समर्पक रेखाचित्रे आणि कलात्मक मांडणी याने या पुस्तकाला वेगळ्या कलात्मक उंचीवर नेऊन ठेवले आहे. चतुरस्र संपादक प्रज्ञा जांभेकरांनी पुस्तकाला एका सूत्रात बांधून त्याला आकार देण्याचे मोलाचे काम केले आहे. पुस्तक पूर्णपणे रंगीत असल्यामुळे त्याची किंमत थोडी जास्त वाटू शकते. पण त्याचे उत्कृष्ट निर्मिती मूल्य लक्षात घेतले तर वाचकांना हा अनमोल ठेवा असल्याचे लक्षात येईल. मराठीत अशी पुस्तके अपवादानेच पाहायला मिळतात.

पाण्याच्या गतिमान प्रवाहात एखादे बेट स्वतंत्रपणे तयार व्हावे, प्रवाहापासून अलग असावे तशी ही मराठी साहित्यप्रवाहातील ललितगद्य लेखन कृती. प्रत्येकाने या वेगळ्या प्रयोगाची अनुभूती घ्यायला हवी.

आठवचित्रे 

संपादक ः प्रज्ञा जांभेकर

प्रकाशन ः सदामंगल पब्लिकेशन मुंबई

पृष्ठे ः 87 (रंगीत) मूल्य ः 400 रुपये