परीक्षण- जीवनानुभवाचे अनवट कथन

>> डॉ. संदीप दळवी

प्रसाद कुमठेकर हे नाव मराठी कथात्मक साहित्यात अधिकाधिक ठळक होत आहे. त्यांचे कादंबरी आणि ललित गद्यात्मक लेखन लक्षणीय ठरले आहे. आशयाविष्काराची नवी घडण त्यांच्या लेखनात आहे. ‘बगळा’, ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱया’, ‘अतीत कोण…मीच’ या लेखनातून त्यांनी मराठी कथनसृष्टीचा पैस विस्तारला आहे. अतिशय तरलपणे अनुभवद्रव्याला आकारीत करण्याचे कसब त्यांच्या जवळ आहे. तसेच चित्रित करीत असलेल्या जगाविषयी अपार आस्थाभाव त्यांच्या लिखाणातून प्रकटला आहे. मूळ कथाबीज कसे विस्तारायचे याचे निराळे आविष्कार तंत्र त्यांच्या जवळ आहे. अनेक कोनांतून, अनेकांच्या दृष्टिबिंदूतून कथन व्यवहाराकडे पाहण्याचे कौशल्यही त्यांच्या जवळ आहे. त्यामुळे त्यांचे कथन पात्रांच्या मनःस्थितीचा वेध घेतेच, त्याबरोबरच त्यास कारणीभूत असणाऱया परिस्थितीचा आवाजही ध्वनित करते.

त्यांच्या या लेखनाच्या पार्श्वभूमीवर ‘…इत्तर गोष्टी’ हा कथासंग्रह प्रकाशित होणे ही बाब मराठी कथेसाठी आश्वासक ठरावी अशी आहे. गेल्या दोनेक दशकांमध्ये जयंत पवार, आसाराम लोमटे, किरण गुरव, समर खडस यांसह अन्य कथा लेखकांनी अतिशय सकस अशी कथा लिहिली. या परंपरेचा धागा बळकट करणारा हा लेखक आहे. खरे तर त्यांच्या कथांमधील अनुभव फारसे अपरिचित नाहीत. परिचित विषयांनाच त्यांनी रूपाच्या पातळीवर असे काही तोलून धरले आहे की, काही काळ आपण अवाक् होऊन जातो. घटना, प्रसंगाकडे असेही पाहता येते, याचे नवे भान हे लेखन देते. या संग्रहातील काही कथा कमालीच्या अस्वस्थ करून जातात.

प्रस्तुत कथांमधील निवेदक वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याचा पिंड मौखिक परंपरेतील गोष्टींनी घडला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, आरत्या, सण-उत्सव, लोककथा, पुराणग्रंथांचे संस्कार त्याच्यावर आहेत. उदगीर परिसराचा, बोलीचा, तिथल्या समाज-सांस्कृतिक पर्यावरणाचाही प्रभाव त्याच्या जडणघडणीवर आहे. एका बाजूला या परंपरागत गोष्टींचे संस्कार आणि दुसऱया बाजूला आधुनिकतेचा ठळक प्रभाव असणाऱया चित्रपट, जाहिरात आदी क्षेत्रांतील वावर अशा दुहेरी विणीतून त्यांची भाषा आकारीत झाली आहे.

हा निवेदक मानवी वर्तनातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवतो. त्यासाठी त्याला बंडखोर पवित्रा घ्यावा लागत नाही. तो अतिशय सहजगत्या या सर्व गोष्टी कथन करतो. त्यामुळे त्याच्या कथनातून साशंकता निर्माण होत नाही. तो सतत सत्यतेच्या समीप नेत राहतो. वास्तवाचे विविध आयाम वृद्धिंगत करत जातो. त्याची विरूपेही दाखवतो. यापलीकडे हे जग कसे असायला हवे, याविषयीही तो एक प्रतिमान उभे करतो. सर्वत्र आपण कडेलोटाच्या टोकावर उभे असल्याचे निदर्शनास आणत नाही. त्यातील चांगुलपणाच्या शक्यताही तो दिग्दर्शित करतो. ‘आस्मानी, सुल्तानी आणि गाढवलाला’ या गोष्टीचा शेवट या अनुषंगाने पाहता येईल. भोवतालच्या दाहकतेत गाढवलालाने सांगितलेली गोष्ट उभारी देणारी आहे.

या संग्रहातील ‘क्ष’ची गोष्ट, ‘अस्मानी, सुल्तानी आणि गाढवलाला’ आणि ‘ह्मॅमरशिया’ या कथांची संरचना वेगळी आहे. त्यातील कथन शक्यताही अनेक बाजूंनी विस्तारणाऱया आहेत. कथावकाशाच्या अनुषंगानेही त्या महत्त्वाच्या आहेत. ‘क्ष’च्या गोष्टीतील अवस्थांतरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘क्ष’चे काय होते, याचे सुतोवाच करणारे कथन अस्वस्थ करते. अवकाशही आदिमतेपासून इजिप्त, बॅबिलॉन, लिडिया ते अजिंठा, वेरूळ असा विस्तारलेला आहे. अर्थात त्यांच्या अन्य कथांमधील कालावकाश हा फार आटोपशीर आहे.

प्रसाद कुमठेकर यांची कथा आशयाभिव्यक्तिच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शोषित, वंचितांच्या अस्तित्व संघर्षाचा प्रश्नांना ती मुखर करते. त्यांच्या असण्या-नसण्याचा कोणताच ठसा काळाच्या पटलावर उमटला नसल्याकडे निर्देश करते.

प्रसाद कुमठेकर गोष्टी नितळपणाने कथन करतात. त्याचा अदमास त्यांच्या अर्पणपत्रिकेवरूनही येतो. आपण फार वेगळे सांगतो आहे, हा कथनपवित्रा येथे नाही. त्यांचा हा विवेक लिखाणामध्ये सतत जागता आहे. समाजजीवनाला स्पर्श करणाऱया राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, पत्रकारिता अशा व्यवस्थांचा हा परामर्श आहे. घटनेकडे पाहण्याची दृष्टी किती प्रगल्भ असावी लागते, याचा प्रत्यय देणारी ही कथा आहे.

‘पपायरस’ प्रकाशनाने आपल्या आजवरच्या लौकिकास साजेशी सुंदर निर्मिती केली आहे. श्री. बा. यांचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे आकर्षक आहेत. किरण गुरव यांचा पाठपृष्ठावरील मजकूर कथासंग्रहाचे नेमके विशेष अधोरेखित करणारा आहे.

…इत्तर गोष्टी

लेखक ः प्रसाद कुमठेकर

प्रकाशक ः पपायरस प्रकाशन

पृष्ठसंख्या ः 188  किंमत ः 340 रुपये