
>> अश्विन बापट
1968च्या काळात जेव्हा इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चरचा तितकासा विकास झालेला नव्हता. त्या काळात व्यवसायाची संधी यशवंत पाळंदे यांनी शोधली. पुणे-मुंबई डेक्कन क्वीनने दररोज प्रवास करत मिक्सर, स्टेशनरी, स्पेअर पार्टस् इत्यादी वस्तूंची ने-आण करायला सुरुवात केली. संपर्क, दळणवळणाची साधनं प्रगत नव्हती. त्या काळात यशवंत पाळंदे यांनी सुरू केलेल्या या ने-आण करणाऱया सुविधेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. हीच ती कुरियर सेवा! पाळंदे कुरियरने पाच दशकांच्या घेतलेल्या भरारीविषयी…
वस्तुंची ने-आण करणाऱया सुविधेचा टेक-ऑफ ज्या व्यक्तीमुळे झाला तेच हे यशवंत पाळंदे! वस्तू पोहोचवणाऱया सुविधेची कक्षा रुंदावणारा व्यवसाय म्हणजे कुरियर सेवा! या सेवेची 1968 मध्ये मुहूर्तमेढ रोवणाऱया यशवंत पाळंदे यांच्या पाळंदे कुरियर सर्व्हिसचे आकाश आज सातासमुद्रापार विस्तारले आहे. त्यांचे पुत्र आशीष पाळंदे आणि त्यांची टीम आज याची धुरा सांभाळत आहे. या वाटचालीबद्दल आशीष यांना बोलते केले तेव्हा ते म्हणाले, “1968 चा तो काळ. इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केल्यास तेव्हा तितकासा विकास झालेला नव्हता. ही बाब नेमकी हेरत माझ्या वडिलांनी पुणे-मुंबई डेक्कन क्वीनने प्रवास करत मिक्सर, स्टेशनरी, स्पेअर पार्टस्ची ने-आण करायला सुरुवात केली. ज्या काळात संपर्क, दळणवळणाची साधनंही तितकीशी प्रगत नव्हती. त्या काळात बाबांनी सुरू केलेल्या या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. सोमवार ते शनिवार सकाळी पुण्याहून मुंबईत जायचं, लोकांच्या ऑर्डर्सप्रमाणे ज्या-ज्या वस्तू यादीत असतील त्या विकत घ्यायच्या, परत संध्याकाळच्या डेक्कन क्वीनने मुंबईतून पुणे गाठायचं हा बाबांचा 1968 ते 1981 असा 13 वर्षं नित्यक्रम होता. सुरुवातीला त्यांच्या सोबत पाच-सहा सहकारी होते. आज आमच्याकडे सुमारे 130 लोकांचा स्टाफ आहे. त्यात फ्रेंचायझीची टीमही समाविष्ट केली तर हा आकडा हजाराच्या घरात जातो.
पाळंदे कुरियरची व्यावसायिक वाढ 1981 ला सुरू झाली. तेव्हाच्या युनायटेड वेस्टर्न बँकेने (आताची आयडीबीआय बँक) आम्हाला ड्राफ्ट्स, चेक्स आदी डॉक्युमेंट्सची ने-आण करण्याचं काम दिलं. तिथून आमच्या कंपनीने खऱया अर्थाने उद्योग क्षेत्रात पाय रोवले. आज 55 वर्षांनी आमची पुण्यात दोन, मुंबईत एक अशी ऑफिसेस आहेत. या क्षेत्रात भारतात प्रथम फ्रेंचायझी मॉडेल 1983 साली वडिलांनी आणलं. आमचे अंदाजे 150 च्या घरात फ्रेंचायझी आहेत. आज कॉस्मेटिक्स, फार्मा उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, खाद्य पदार्थ अशा सर्वच वस्तूंची ने-आण आमची कंपनी करते. देशात सर्वच राज्यांत आणि जगात सुमारे 100 देशांमध्ये आम्ही पोहोचलोय. अमेरिका, इंग्लंड, युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसारख्या देशांमध्ये आमची सेवा कानाकोपऱयात पोहोचली आहे.
या सर्व वाटचालीत कोरोनाचा काळ हा अत्यंत खडतर राहिला. ऑनलाइन कल्चर वाढलं. डिजिटल पेमेंट आलं. साहजिकच कागदपत्रांचा व्यवहार कमी झाला. त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाला. डॉक्युमेंट बिझनेस अवघ्या 10 टक्क्यांवर आला. कोरोनाच्या आधी 10 हजार पार्सल्स किंवा डॉक्युमेंट्स प्रतिदिन आम्ही डिलिव्हरी करत असू. जो आकडा आता दीड हजाराच्या घरात आला. पूर्वी शेअर्स, बँक स्टेटमेंट, म्युच्युअल फंड स्टेटमेंट, लग्नपत्रिकांच्याही डिलिव्हरीच्या मोठय़ा ऑर्डर्स आमच्याकडे असत. आता लग्नपत्रिका व्हॉट्सआपवर येऊ लागली. अशा तांत्रिक प्रगतीने आमच्या व्यवसायावर इम्पॅक्ट झाला. त्यातून आम्हाला मार्ग काढावा लागला. काही वर्षं आधी 2007 पासून आम्ही बँकेसाठी स्पेशलाईज्ड सर्व्हिस सुरू केली आहे. त्यात चेक क्लिअरिंग, डॉक्युमेंट डिजिटायझेशन, डेटा एन्ट्री अशा कामांसाठी आम्ही स्टाफ नेमून पन्नासहून अधिक बँकांना सेवा देतो. त्याकरिता अंदाजे 70 जणांचा वेगळा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.
भविष्यात कार्गो, वेअरहाऊसिंग, पॉइंट टू पॉइंट सर्व्हिस अशी प्रमुख शहरांमध्ये आम्ही सुविधा देणार आहोत. तसंच हायपर लोकल सेवा म्हणजे जशी फूड डिलिव्हरीमध्ये आता व्ही फास्ट, डनझोसारखी सर्व्हिस उपलब्ध आहे, तशीही सेवा आम्ही पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी सुरू करणार आहोत. उदाहरणार्थ, दादरचं एखादं पार्सल दोन तासांत अंधेरीत किंवा ठाण्यात पोहोचू शकेल, अशा टाईपची ही सेवा असेल. तसंच पुण्यासारख्या ठिकाणी जेवणाचे डबे ( हेल्दी टिफिन, डाएट फूड इ.) पोहोचवण्याची सुविधाही आम्ही सुरू केली आहे. अंदाजे 40 ते 50 ग्राहक आमच्याशी जोडले गेलेत आणि रोज सुमारे 1000 डब्यांची डिलिव्हरी आम्ही करतो. शिवाय कर्वे रोड, पुणे येथे वृंदावन नावाचं व्हेज हॉटेलही सुरू केलंय. माझी पत्नी अर्चना त्यात मला मोलाची मदत करते. जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय ही त्रिसूत्री लक्षात ठेवून आम्ही काम करत असतो. ग्राहक केंद्रस्थानी ठेवून काम करतो. तो तुमच्या सेवेमुळे कसा समाधानी राहील याची दक्षता घे, हा माझ्या वडिलांचा कानमंत्र समोर ठेवून मी आणि माझी टीम काम करत असतो, असं आशीष यांनी गप्पांची सांगता करताना सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)