गुलदस्ता- राम गबाले आणि…

>> अनिल हर्डीकर

एखादी भेट आयुष्यावर कायमची कोरली जाते. दिग्दर्शक राम गबाले यांची अशीच एका अनामिकेशी घडलेली भेट त्यांच्या कायम स्मरणात राहिली, अन् ती पुढे चित्रपटाच्या माध्यमातून साकारली गेली.

‘आत्मचित्र’ नावाचे आत्मचरित्र राम गबाले यांनी लिहिले आहे. राम गबाले फार मोठी असामी. चित्रपट क्षेत्रात मानाचे समजले जाणारे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले होते. ‘शतायू केसरी’साठी केसरीच्या शताब्दी सोहळ्यात इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार मिळाला होता. गदिमा प्रतिष्ठानचा ‘गदिमा’ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा (1998-99) चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा ‘पु.ल बहुरूपी’, राजकमल कलामंदिरतर्फे ‘व्ही शांताराम स्मृती’ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ‘चित्रपती व्ही शांताराम’ पुरस्कार, अल्फा टीव्हीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’  पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने त्यांना मिळवून दिले.

 एवढेच नव्हे तर मोठी महत्त्वाची पदेदेखील त्यांनी भूषवली. त्याची यादी फार मोठी आहे. त्यांनी दिग्दर्शक या नात्याने अनेक चित्रपट केले. ‘वंदे मातरम्’, ‘मोठी माणसं’, ‘देव पावला’, ‘जोहार मायबाप’, ‘जशास तसे’, ‘दूधभात’, ‘घरधनी’, ‘नरवीर तानाजी’, ‘देवबाप्पा’, ‘पोस्टातली मुलगी’, ‘शेर शिवाजी’, ‘छोटा जवान’ (यात महेश कोठारे बाल कलाकार होते). त्यांचा ‘जिव्हाळा’ चित्रपट तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, पण त्यातील संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी तुम्ही नक्की ऐकली असणार. ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या’ आणि ‘चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी,’ तर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले. या अनाथाश्रमाची पार्श्वभूमी असलेल्या कथानकावर चित्रपट करण्याची प्रेरणा मिळायला कारणीभूत ठरलेल्या भेटीबद्दल तुम्हाला सांगतो.

1952 मध्ये आलेला पु. ल. देशपांडे यांची कथा आणि संगीत असलेल्या ‘दूधभात’ या चित्रपटात पार्श्वभूमी होती ती अनाथ आश्रमाची. त्यामुळे प्रत्यक्ष रूपात त्या वातावरणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी गबाले यांचे उमरखडीला आणि माटुंग्याला श्रद्धानंद अनाथाश्रमात अनेकदा जाणे होत असे. अशाच एका भेटीच्या वेळी एक लक्षात रहावा असा प्रसंग घडला. त्या आश्रमाच्या संचालिका ताराबाई बस्तीकर म्हणून होत्या. ज्या सामाजिक समस्येचा आपुलकीने अभ्यास करणाऱया होत्या. गबाले यांच्या मनात मुलांबद्दल असलेल्या आस्थेबद्दल ताराबाईना काहीसे कौतुक होते. एकदा गबाले असेच श्रद्धानंद अनाथाश्रमात गेलेले असताना ताराबाई गबाल्यांना काही समजावून सांगत असताना संस्थेच्या मुख्य दरवाजाकडे पाहून त्या म्हणाल्या, “जरा माफ करा हं!’’ आणि जागच्या उठत अतिशय आदराने “या, बसा’’ असे एका गृहस्थांना म्हणाल्या. साधारणपणे पन्नाशीच्या जवळ आलेले ते गृहस्थ गबाल्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले. एक मिनिट गेल्यावर  ताराबाईंने समोरचे कागद सरकवून त्या गृहस्थांना म्हणाल्या, “चला’’ आणि दोघेही दुसऱया दारातून आत चौकात जाऊन उभे राहिले. मुले खेळत असताना ते गृहस्थ शांतपणे पाहत उभे होते. हे दृश्य गबाले खिडकीतून पाहत होते. गबाल्यांच्या मनात त्या गृहस्थाविषयी कुतूहल जागृत झाले. दोन-तीन मिनिटे झाली असतील, त्या गृहस्थांनी कोटाच्या खिशातून एक लिफाफा काढला आणि ताराबाईंच्या हातात दिला. मग दोघेही गबाले ज्या कार्यालयात बसले होते तिथे परत आले. हे गृहस्थ पुन्हा खुर्चीवर न बसता, “बराय, मी येतो’’ असे म्हणून निघून गेले. त्यांनी गबाल्यांकडे पाहिलेदेखील नाही. दखल तर राहू द्याच. ताराबाई त्यांना आश्रमाच्या दारापर्यंत सोडायला जाऊन आल्या. पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या आणि गबाल्यांना म्हणाल्या, “आता जे गृहस्थ आले होते ना त्यांच्याशी मुद्दामच ओळख करून दिली नाही. कारण मी पाहते आहे गेली नऊ वर्षं हे गृहस्थ असेच इथे येतात, माझीसुद्धा त्यांच्याशी ओळख नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचे नावही मला माहीत नाही. वर्षातून आजच्याच दिवशी असे येतात, एक पाकीट देतात त्यात पाचशे रुपये आश्रमाला देणगी म्हणून देतात आणि चौकात जाऊन मुले खेळताना पाहून थोडे थांबून निघून जातात.आमच्या हिशेबात अनामिक म्हणून ही रक्कम आल्याची नोंद तुम्हाला दिसेल.’’

राम गबाले आश्रमातून निघून बॉम्बे लॅबकडे गेले, पण त्यांच्या डोळ्यांसमोरून ती निनावी व्यक्ती दूर जातच नव्हती. मनात विचार एकच, का येत असतील ते गृहस्थ असे अनाथाश्रमात? हा प्रसंग घडला होता 1953 मध्ये. पुढे कितीतरी वर्षांनंतर राम गबाले यांनी  ‘जिव्हाळा’ नावाचा चित्रपट केला जो अनाथाश्रमाच्या विषयावरच्या श्री महादेवशास्त्राr जोशी यांच्या कथेवर होता. त्या कथेवर चित्रपट करावा असे वाटण्याचे बीज कुठेतरी याच प्रसंगात रुजले होते. एक भेट आयुष्यात किती संस्मरणीय होऊ शकते नाही का?

[email protected]