
>> पूजा सामंत
एखादा नामांकित कलाकार जेव्हा त्याच्या व्यक्तिरेखेत सामावून जातो तेव्हा तो कलाकार तो न वाटता पडद्यावर फक्त ती व्यक्तिरेखा दिसते आणि हे त्या कलाकाराचे निर्विवाद यश असते. आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे सोने करणारी कसदार अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी! सोनालीच्या अनेक भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. सार्वजनिक व व्यक्तिगत आयुष्यात ती परिपूर्ण आहे. प्रामाणिक आहे. अभिनयात शंभर नंबरी सोनं आहे. सोनालीच्या कारकिर्दीला 30 वर्षे पूर्ण झालीत. मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीत मानाने वावरणाऱया या गुणी अभिनेत्रीशी अनेक मुद्यांवर झालेल्या गप्पागोष्टी तिच्याच शब्दात…
माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला 32 वर्षं उलटून गेलीत. अनेक उत्तम भूमिका मला आजही लाभत आहेत यालाच मी भाग्य म्हणते. सतत करियरमध्ये नव्या संधी, नवी आव्हानं, व्यक्तिगत आयुष्य, कधी सोशल कमिटमेंट्स, लिखाण यात रमून गेले आहे. पण मुलाखतींमधून जेव्हा मी माझ्या आयुष्याचा ताळेबंद मांडते तेव्हा बालपण, कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटलेले पंडित सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड, माझ्या कॉलेजचे प्राचार्य बाचल, मला भरतनाटय़म नृत्यात तरबेज करणाऱया शिक्षिका, अनेक गुरुवर्य आठवतात. या आणि अशा अनेक मान्यवरांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे मी आयुष्यात पुढे घडत गेले. मध्यमवर्गीय कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. मोठा भाऊ संदीप, मग संदेश आणि मग मी शेंडेफळ. लेखन, वाचन यांचे संस्कार आमच्या तिघांवर आई-बाबांनी घडवलेच. मी स्पोर्ट्समध्ये अग्रेसर होतेच, पण नृत्याची आवड असल्याने तब्बल आठ वर्षं मी भरतनाटय़म शिकले. शास्त्रीय संगीत शिकले. अभिनयात माझ्या नृत्याला वाव मिळेल अशी भूमिका मला मिळाली नाही ही खंत आहे मला आजवर.
अभिनयाशी माझ्या कुटुंबातील कुणाचाही दुरान्वयाने संबंध नाही. ना कधी होता. मी अकरावीत असताना पंडित सत्यदेव दुबे या अभिनयातल्या आदरणीय गुरूंनी पुण्यात आक्टिंग वर्कशॉप घेतलं. मी ते वर्कशॉप अटेंड केलं. अकरावीत येईपर्यंत पुढे करियर कशात करायचं याचं आकलन झालेलं नव्हतं. पण दुबेंच्या वर्कशापला गेल्यानंतर जादूची कांडी फिरावी तसं झालं. धूसर चित्र हळूहळू स्पष्ट झालं. मला अभिनय करण्यात आनंद मिळू लागला. भिन्न व्यक्तिरेखांचा आत्मा स्वतमध्ये उतरवताना एक वेगळंच समाधान लाभू लागलं. याच काळात मी प्रायोगिक थिएटर करायला लागले. तेव्हा लक्षात आलं की अरे, मी या क्षेत्रात बरंच काही करू शकते. पुढचा टप्पा होता प्रसिद्ध अभिनेते, लेखक-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ या सिनेमाचा. कर्नाडांनी माझी क्रीन टेस्ट घेतली. फोटो शूट केलं आणि माझी ‘चेलुवी’साठी निवड झाली. आमच्या अनेक पिढय़ांत कधी कुणी कॅमेरा फेस केला नव्हता किंवा नाटकात लहानशी भूमिकाही केली नव्हती.माझा मोठा भाऊ संदीप यालाही अभिनयात रस वाटू लागला. गिरीश कर्नाड यांनी ध्यानीमनी नसताना आपल्या सोनालीला सिलेक्ट केल्यावर आई-बाबा आनंदले. पण चिंतेतही पडले. कारण या फिल्मच्या चित्रणासाठी केरळला जायचं होतं. मला केरळला ड्रॉप करण्यासाठी दोघेही माझ्यासोबत आले. आठ-दहा दिवस मला सोबत करावी या हेतूने आले. पण तिथे गिरीश कर्नाडसारखा सालस सज्जन माणूस, साबू सिरीलसारखी (आर्ट डायरेक्टर ), जयू नचिकेत पटवर्धन, राजीव मेनन (डीओपी ) अशी दिग्गज मंडळी होती. घरगुती अनौपचारिक सहज वातावरण पाहून त्यांना समाधान वाटलं आणि दोन-तीन दिवसात ते पुण्याला परत गेले.
… आणि हो, गिरीश कर्नाडांनी जेव्हा मला फोनवरून माझी ‘चेलुवी’साठी निवड झाली असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यांना त्याच दरम्यान माझी परीक्षा असल्याचं सांगितलं. पण ते मला त्या भूमिकेसाठी घेण्यास उत्सुक होते. त्यांनी आमच्या प्राचार्यांना पत्र लिहिलं आणि माझी परीक्षा उशिरा घेण्यास विनंती केली. प्राचार्यांनी मान्यताही दिली. खरंच… गिरीश कर्नाडसारखे दिग्गज दिग्दर्शक, प्राचार्य बाचल, चेलुवी फिल्मची स्टारकास्ट, माझ्या आईवडिलांचा मला असलेला पाठिंबा… यामुळे सगळं आपोआप, विना अडथळा होत गेलं. हा चित्रपट माझ्या करिअरचा पाया होता. नंतर मार्ग बनत गेला.
मी अमुक एक चित्रपट केला, आता मी नाटक करेन, मग दाक्षिणात्य चित्रपटांत काम करेन, मग डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या बायोग्राफीत काम करेन वगैरे बोलण्याची उदाहरणं झाली. पण काहीही न ठरवता घडत गेलं. माझं करिअर आखून देणारा कुणी मेंटॉर, गाईड, गॉडफादर नव्हतेच कधी. उत्तम वेगळ्या कसदार, आशयघन असलेल्या भूमिका मिळत गेल्या. तितकीच उत्तम माणसं -उत्तम मेकर्स, अतिशय उत्तम लेखक, सहकलाकारांची साथ सगळं टय़ुनिंग जुळत गेलं. म्हणून माझ्या अभिनयाच्या वाटा सुकर झाल्या. हे श्रेय माझं एकटीचं नाही.
करिअरच्या आरंभी मला काही न्यूनगंड होते. पुण्याच्या मध्यमवर्गीय संस्कृतीचा पगडा होता. अर्थात मध्यमवर्गीय संस्कृतीला कमी लेखत नाही, पण गर्भश्रीमंतासारखी भौतिक सुखं नसतात हे वास्तव आहे. आम्ही श्रीमंत नाही. मी वर्णाने गोरीपान नाही. माझ्याकडे टिपिकल सौंदर्य नाही असे काही कॉम्प्लेक्सेस मला होते. नंतर संकोचाच्या भिंती आपोआप दूर होत गेल्या. एका मागोमाग कामं मिळत गेली. मी किती श्रीमंत आहे, माझी लाइफस्टाइल पंचतारांकित आहे की नाही, माझं सौंदर्य पारंपरिक निकषांवर आहे की नाही… कुणीही कधी विचारलं नाही किंवा ज्या ऑडिशन दिल्या तिथेही कधी अशी जाणीव झाली नाही. खुल्या मनाने जे आहे ते स्वीकारावं आणि अभिनयातली कामगिरी चोख बजावावी या वृत्तीने मी काम करत गेले. 30-32 वर्षांच्या कालावधीत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार लाभलेत. ऑडिशनमध्ये जर मी त्या व्यक्तिरेखेच्या जवळ जात असेन तर मला ते काम मिळेल असा विचार मनात ठेवला आणि झालंही तसंच. कॉलेजमध्ये शिकताना मी हॉस्टेलमध्ये राहावं असं एक स्वप्न होतं. पुढे कामासाठी मी एकटी मुंबईत राहिले आणि आईबाबा पुण्यात. फार कमी वयात अभ्यासासाठी नाही तर आक्टिंगसाठी मुंबईत आले आणि कालेजच्या दिवसातलं स्वप्न पूर्ण झालं. !
मराठी माझी मातृभाषा पण मी हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, गुजराती अनेक भाषांमधून कामं केलीत याचं श्रेय पंडित सत्यदेव दुबे यांना जातं. ते म्हणायचे, काम करण्यासाठी तात्पुरती भाषा शिकू नका. त्या भाषेवर प्रेम करा. माझी वाणी, माझे मराठी-हिंदी उच्चार त्यांच्यामुळे अधिक चांगले झाले. मी शुध्द हिंदी उच्चारांसाठी वर्कशॉप केली आहेत. पंजाबी कलाकार जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा त्याचा पंजाबी हेल हिंदीत जाणवतो. दाक्षिणात्य व्यक्ती जेव्हा हिंदी, इंग्रजी बोलतो तेव्हा त्याच्या उच्चारांवर त्याच्या मातृभाषेची झलक जाणवते. पण मराठी कलाकार जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा ते सदोष आहेत, त्यात मराठीचा प्रभाव आहे असं का म्हटलं जातं? हा उलगडा मला अजूनही होत नाही. मी मराठी सिनेमा, हिंदी, नाटक, ओटीटी या सगळ्या माध्यमांमध्ये कामं करत असताना त्यातलं तंत्र जाणून घेतलं. रंगभूमीवर काम करताना तुमचा आवाज भूमिकेचा सर्वस्व असतो. सिनेमामध्ये डबिंग होत असल्याने आवाजातील दोष (असले) चालून जातात. मोठय़ा आवाजात बोलण्याची गरज नसते. अशा अनेक लहानमोठय़ा तांत्रिक बाजू शिकले आणि समजून घेतल्या.
माझ्या कारकिर्दीत करिअरला वेगळी दिशा देणारा, खूप अविस्मरणीय आठवणींचा चित्रपट म्हणजे ‘दिल चाहता है!’ 25 वर्षं पूर्ण झाला तरी rमला हा चित्रपट नॉस्टॅल्जिक फील देतो. आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना अशा ग्रेट कलाकारांसोबत काम करणं खूप शिकवणारं होतं. ‘मिशन कश्मीर’मध्ये मी हृतिक रोशनच्या आईच्या आणि संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत होते. आईची भूमिका मी का स्वीकारली, असं मला विचारलं जातं? माझ्यावर कायम आईचा शिक्का बसू नये यासाठी मी पुढे तशा भूमिका टाळल्या. विधू विनोद चोप्रासारखा दिग्दर्शक, नामांकित स्टारकास्ट, मोठे बॅनर, माझी उत्तम व्यक्तिरेखा, चोख आणि व्यवस्थित मानधन मिळणं या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. मग अशी रिस्क घ्यायला हवीच, नाही का?
मामुटीसोबत मी डॉ. आंबेडकर हा दाक्षिणात्य सिनेमा केला. त्याला इतकी वर्षं झालीत की तो मला ओळखेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण चेन्नईला शूटिंगसाठी गेले होते तेव्हा त्याला निरोप पाठवला. त्याने आवर्जून बोलावून घेतलं आणि बरोबर असलेल्या मेकर्ससोबत परिचय करून देत म्हटलं, यह रही मेरी रमा आणि मग आम्ही केलेल्या फिल्मबद्दल माहिती दिली. खूप विनम्र कलाकार आहे मामुटी!
जब्बार पटेल, नाना पाटेकर, अमोल पाटेकर अशा अनेक दिग्गजांसोबत काम करता आलं. माझं कलाजीवन खूप समृद्ध होत गेलं.