
पाकिस्तानविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्राची शौर्यगाथा आता पुस्तकात आणली जाणार आहे. पाठय़पुस्तकात याचा समावेश करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय देशातील सर्व भाषांत ब्रह्मोस-आकाश क्षेपणास्त्राच्या शौर्यगाथेचे धडे दिले जाणार असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
पाठय़पुस्तकात याचा समावेश केल्यानंतर या दोन्ही क्षेपणास्त्रांची शौर्यगाथा धडय़ातून विद्यार्थ्यांसमोर उलगडणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रs हे आपल्या लष्करासाठी मजबूत प्रमाण आहे. त्यामुळे याची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच कळायला हवी. यासाठी पीएम रिसर्च फंडमध्ये आवश्यक ते बदल केले जातील, असेही ते या वेळी म्हणाले. मुलांना लहानपणीच राष्ट्रीय हितांशी जोडायचे असेल तर त्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत शिक्षण द्यावे लागेल. याचा फायदा नक्कीच मुलांना मिळेल. तसेच ते भविष्यात शोध आणि नावीन्य निर्माण करून देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मुलांना याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रांची माहितीसुद्धा मुलांना देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
क्षेपणास्त्रांची खास वैशिष्टय़े
– ब्रह्मोसचा वेग 9878 किमी प्रति तास आहे. रेंज 400 किमी, तर याचे वजन 1290 किलोग्रॅम आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लांबी 8.4 मीटर असून 3 हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.
– आकाशचा वेग 3087 किमी प्रति तास इतका आहे. लांबी 5.78 मीटर असून वजन 720 किलो आहे. याची रेंज 80 किलोमीटरपर्यंत आहे. 60 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.
पाक आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या हिंदुस्थानी लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे धडे उत्तराखंडच्या मदरशामध्ये शिकवले जाणार आहेत.