खड्ड्यामुळे 50 लाखांची नुकसानभरपाई मागितली

बंगळुरू शहरातील खराब रस्ते, खड्डे यामुळे प्रकृती बिघडली असून 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी नोटीस 43 वर्षीय धिव्या किरणने बंगळुरू महानगरपालिकेला (बीबीएमपी) पाठवली. रिचमंड टाऊन येथील रहिवासी असलेल्या धिव्या किरणने नोटिसीत म्हटलंय की, मी करदाता असून बंगळुरू महानगरपालिकेने बनवलेल्या खराब रस्त्यांमुळे शारीरिक त्रास आणि मानसिक आघाताचा सामना करावा लागत आहे. खचलेले रस्ते, मोठे खड्डे, तुटके फूटपाथ आणि खराब रस्ते यामुळे आयुष्य खडतर बनलंय. त्यामुळे मान आणि पाठीचे गंभीर दुखणे उद्भवलंय. परिणामी अनेकदा ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि सेंट फिलोमेना हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचारासाठी धाव घ्यावी लागली. हा शारीरिक आणि मानसिक त्रास व त्यावरील उपचारांचा खर्च म्हणून बंगळुरू महानगरपालिकेने 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धिव्या किरणने केली आहे.