रत्नागिरीत दणकावून पाऊस… विलवडेत दरड कोसळली, कोकण रेल्वे तीन तास ठप्प

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आज विजांच्या तांडवासह झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढल्याने राजापूरजवळच्या विलवडे येथील मांडवकर वाडी बोगद्यासमोर साडेपाच वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने सुपरफास्ट शताब्दी आणि तेजस एक्प्रेससह अनेक गाडय़ा अडकून पडल्या. कोकण रेल्वे तब्बल तीन तास ठप्प झाली. या मार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱया आणि मुंबईच्या दिशेने येणाऱया सर्व रेल्वे गाडय़ांना याचा फटका बसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले.

केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात येण्याआधीच कोकणात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातल्याने कोकणवासीयांची चांगलीच धांदल उडाली आहे. यातच रत्नागिरीत अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले. कोकण रेल्वेला या पावसाचा मोठा फटका बसला. विलवडेत रेल्वे स्टेशनजवळच एकच मार्ग असलेल्या रुळांवर आणि अगदी बोगद्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर कोसळलेली दरड पूर्णपणे मार्गावरून हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरू झाली.