
मुंबईत मंगळवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. पुढील चार दिवस, 24 मेपर्यंत मुंबई, ठाण्याबरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टी, राज्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मंगळवारी सायंकाळी मुंबई शहर परिसर व उपनगरांमध्ये अचानक गडगडाट आणि विजांच्या कडाकडाटासह पाऊस कोसळला. कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा मुंबई, पालघर, ठाणेसह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच राज्याच्या अनेक भागांत परिणाम दिसून येणार आहे. काही भागांत अतिवृष्टी, काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
– कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यात मुंबई, ठाण्याचा समावेश आहे. मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
चार-पाच दिवसांतच मान्सून केरळात येणार
यंदा मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनूकूल स्थिती निर्माण झाली असून पुढील चार-पाच दिवसांतच मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला. येत्या चार-पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव व कोमोरिनचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ, तामीळनाडू, दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत तसेच ईशान्य बंगालच्या उपसागरात व ईशान्य राज्यांच्या काही भागांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.
तडाखा… छप्पर-होर्डिंग कोसळले, मच्छीमारांना इशारा
राज्याच्या विविध भागात झालेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळणे, होर्डिंग पडणे, मोबाईल टॉवर कोसळल्याच्या घटना घडल्या. समुद्राला उधाणाची स्थिती 24 मेपर्यंत तीव्र राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.