
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) बांगलादेशवर दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात सनसनाटी विजय मिळविला. या विजयासह यूएईने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. कर्णधार मुहम्मद वसीमच्या वादळी 82 धावांची खेळी यूएईच्या विजयात निर्णायक ठरली. सामनावीराची माळ अर्थातच वसीमच्याच गळ्यात पडली.
बांगलादेशकडून मिळालेले 206 धावांचे लक्ष्य यूएईने 19.5 षटकांत 8 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. मुहम्मद वसीम (82) व मुहम्मद जोहैब (38) यांनी 61 चेंडूंत 107 धावांची खणखणीत सलामी देत यूएईच्या आशा पल्लवीत केल्या. वसीमने 42 चेंडूंत 9 चौकार व 5 षटकारांसह आपली तडाखेबंद खेळी साकारली, मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर यूएईकडून कोणालाच मोठी खेळी करता न आल्याने सामना बांगलादेशकडे झुकला. मात्र आठव्या क्रमांकावर आलेल्या हैदर अलीने 6 चेंडूंत एका षटकारासह 15 धावा फटकाविल्यामुळे यूएईला विजयाला गवसणी घालता आली. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लाम, नाहिद राणा व रिशाद होसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट टिपले.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 5 बाद 205 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तंझीद हसन (59) व कर्णधार लिटन दास (40) यांनी 55 चेंडूंत 90 धावांची भागीदारी करीत बांगलादेशला जोरदार सलामी दिली. तंझीदने 33 चेंडूंत 59 धावा करताना 8 चौकारांसह 3 षटकार ठोकले,