रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात तुळस-हळदीचा काढा प्यायलाच हवा, वाचा

पावसाळा म्हटल्यावर अनेक आजारांची सुरुवात होण्याचा काळ. खासकरुन सर्दी, खोकला हा पावसाळ्यात पाचवीला पूजलेला असतो. त्यामुळेच पावसाळ्यात आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यामध्ये बाहेरचे अन्न शक्य तितके टाळावे. जेणेकरून संसर्गजन्य रोगांपासून बचाव होईल. पावसाळ्यातील रोगांशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी घटकांपैकी एक म्हणजे तुळस आणि हळदीचा काढा. या काढ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

पावसाळ्यात चिमूटभर ओवा खाण्याचे काय होतील फायदे? वाचा

तुळस आणि हळदीचा काढा तयार करण्यासाठी साहित्य

अर्धा चमचा हळद, तुळशीची पाने-8-12, मध – 2-3 चमचे, दालचिनी- 1, लवंगा – 3-4

काढा कसा बनवायचा

एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यावे. यामध्ये हळद, तुळशीची पाने घालून चांगले उकळून घ्यावे. याच पाण्यामध्ये लगेच लवंगा आणि दालचिनी घालावी. मिश्रण 15 मिनिटे चांगले कडकडीत उकळून घ्यावे. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर, गाळून घ्यावे. हे पाणी अगदी असे पिताना त्रास होत असेल तर, थोडा मध घालावा. पावसाळ्यातील सर्दी आणि खोकल्यावर मात करण्यासाठी हा काढा रामबाण इलाज आहे.

तुळस हळदीचा काढा पिण्याचे फायदे

हळद आणि तुळस या दोन्हींमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म सर्दी, खोकला आणि घसा दुखणे कमी करण्यास मदत करतात.

हळदीत आणि तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. यामुळे आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास तुळशीचा आणि हळदीचा महत्त्वाचा उपयोग होतो. यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी हळदीचा आणि तुळशीचा वापर आहारात व्हायलाच हवा.

हंगामी ताप कमी करण्यासाठी, तुळशी आणि हळदीचे मिश्रण फार लाभदायी आहे.

तुळस आणि हळदीचे सेवन बद्धकोष्ठता आणि लूज मोशन कमी करण्यास मदत करते.