आणखी आठवडाभर ‘धो-धो’ हजेरी, कोकणपासून गुजरातपर्यंत पाऊस धुमशान घालणार

महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. हा पाऊस आणखी आठवडाभर केरळ, कोकण, गोवा, कर्नाटकबरोबरच गुजरातपर्यंत ‘धो-धो’ हजेरी लावणार आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन त्याचे ‘शक्ती’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत तुफान पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱयासह हजेरी लावलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर पुढील सहा ते सात दिवसांत आणखी वाढणार आहे. केरळमध्ये मान्सूनच्या हजेरीसाठी अनुपूल वातावरण तयार झाले आहे. दोन-तीन दिवसांतच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. याचदरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन उत्तरेकडे सरकत आहे. परिणामी, संपूर्ण कोकण किनारपट्टीसह कर्नाटक, गोवा, केरळ व गुजरातच्या बहुतांश भागांत आठवडाभर पाऊस धुमशान घालण्याच्या तयारीत आहे. हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवून खबरदारीचा इशारा दिला आहे.

मुंबईत रविवारपर्यंत मुसळधार पाऊस

हवामान खात्याने मुंबईसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईच्या शहर परिसरासह उपनगरांमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढचे 36 तास महत्त्वाचे

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 36 तासांत आणखी तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीला याचा जास्त फटका बसेल. वाऱयाचा वेग ताशी 35 ते 40 किमी, तर काही ठिकाणी ताशी 60 किमी राहील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांला ‘रेड अलर्ट’

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.