
>> आशिष बनसोडे
आमचे पटत नाही, सुखाचा संसार होईल अशी परिस्थिती नाही, इथंपर्यंतच बस्स, यापुढे साथसंगत नको… या आणि अशा अनेक कारणांनी घटस्फोट घेणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. अशी अनेक दांपत्य विभक्त होण्यासाठी खटपट करत असताना पोलिसांनी त्यांच्या नात्याला मजबुतीचा जोड दिला आहे. दीड वर्षात 75 दांपत्यांचे घटस्फोट रोखून त्यांच्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
संवादाचा अभाव, गैरसमज, अहंपणा, घरगुती वाद, समजून न घेणे आदी कारणांमुळे दांपत्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन प्रकरण विभक्त होण्यापर्यंत जाते. मुंबई पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंध शाखेकडे असे विभक्त होऊ इच्छिणाऱयांचे अनेक अर्ज दाखल होत असतात. वर्ष 2024 मध्येदेखील असे बरेच अर्ज या शाखेकडे आले होते. पण वरिष्ठ निरीक्षक अपर्णा जोशी, सपोनि संगीता पाटील, अर्चना दयाळ व पथकाने योग्य समुपदेशन करून 64 दांपत्यांचा संसार तुटण्यापासून रोखला. तर या वर्षी आतापर्यंत 11 दांपत्यांना ‘नांदा सौख्य भरे’चा मूलमंत्र दिला आहे.
तीन टप्प्यांत समुपदेशन
महिला अत्याचार प्रतिबंध शाखेत अर्ज आल्यानंतर विभक्त होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या दांपत्यांचे कक्षातील अधिकारी व कर्मचारी तीन टप्प्यांत समुपदेशन करतात. या टप्प्यांमध्ये योग्य समुपदेशन करून त्यांच्यात समझोता घडवून आणला जातो.
…तर पोलीस ठाणे अन्यथा न्यायालयात
तीन टप्प्यानंतरही समझोता झाला नाही तर संबंधितांना काwटुंबिक न्यायालयात पाठवले जाते. ज्या प्रकरणात हिंसा असेल ते प्रकरण पोलीस ठाण्यात पाठवले जाते. वर्ष 2024 मध्ये 313 प्रकरणांवर समझोता होऊ शकला नव्हता. तर या वर्षी आतापर्यंत 104 प्रकरणांत प्रयत्न करूनही समेट घडवता आली नाही.
ठिकठिकाणी जनजागृती
गुन्हे शाखेच्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाकडून दांपत्यांनी विभक्त होऊ नये आपापसात संवाद, मत आणि मनभिन्नता होत असल्यास ते कसे रोखावे. आपले नाते घट्ट व सुदृढ कसे ठेवावे यासाठी अपर्णा जोशी व त्यांचे पथक ठिकठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम राबवितात. गतवर्षी 35 तर या वर्षी आतापर्यंत 10 कार्यक्रम विविध ठिकाणी घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.