लिहून देतो, ठाकरे-पवार ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही! राज ठाकरे यांची सडेतोड भूमिका

राज्यातून ठाकरे अणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यात कोणताही वाद नाही. मात्र ‘मी लिहून देतो, ठाकरे-पवार ब्रँड संपणार नाही,’ अशी सडेतोड भूमिका आज ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली.

‘मुंबई-तक जयहिंद उत्सव’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. दिल्लीच्या राजकारणात जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो त्यावेळी दोन नावे प्रकर्षाने समोर येतात, ती म्हणजे ठाकरे आणि पवार! मात्र  शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातून ठाकरे, पवार नावाचा ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ठाकरे, पवार ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही, असे ते म्हणाले.

आडनाव ही सगळय़ात महत्त्वाची गोष्ट

ठाकरे घराण्यातून आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा पहिला इम्पॅक्ट महाराष्ट्रावर दिसून आला. त्यानंतरचा इम्पॅक्ट पाहिला तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने तुम्ही संगीतात बघितलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे यांचे नाव येते. त्यानंतर मी आणि उद्धव ठाकरे. यामध्ये आडनाव ही सगळय़ात महत्त्वाची गोष्ट आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

ज्यांना हिंदी शिकायचे आहे त्यांनी शिकावे!

सरकारने नवीन शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला, मात्र याला ‘मनसे’ने विरोध केला. यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला असला तरी इतर भाषांची पुस्तकं मी शाळांपर्यंत पोहोचू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जशी मराठी ‘राजभाषा’ आहे तरी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. जागतिक पातळीवर इंग्रजी भाषा आहे. या दोन महत्त्वाच्या भाषा आहेत. ज्यांना हिंदी शिकायची आहे त्यांनी ती शिकावी, असा टोलाही त्यांनी लगावला.