
मुंबईत गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकांकडून पालिकेचा कारभार सुरू आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुका नाहीत, महापौर नाहीत, नगरसेवकही नसल्यामुळे मुंबईकरांकडून नागरी समस्या, तक्रारींचा पाऊस धो धो सुरू आहे. पालिकेकडे गेल्या वर्षभरात सुमारे 1 लाख 15 हजार 396 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करणार कोण, असा सवाल शिवसेनेने राज्य सरकारला केला आहे.
मुंबई महापालिकेच्या कामकाजाबद्दल प्रजा फाऊंडेशनने नुकताच ‘नागरी सुविधांची सद्यस्थिती’ यावर एक अहवाल प्रसिद्ध केला. यात गेल्या दहा वर्षांत मुंबईकरांच्या तक्रारींत 70 टक्के वाढ झाली असून गेल्या वर्षभरात 1 लाख 15 हजार 396 तक्रारी आल्या होत्या. यात कचरा, पाणी, शाळा, रस्ते, शौचालय अशा विविध समस्यांवर मुंबईकरांनी तक्रारी केल्या. आता या वाढलेल्या तक्रारींचे निवारण कोण करणार, असा सवाल सर्वसामान्यांच्या वतीने शिवसेनेने राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, यातील बहुतांश समस्या सोडवण्यात आल्या आहेत, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
श्रीमंत महापालिका तरीही तक्रारींत घट नाही
मुंबई महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका असून यंदाच्या अर्थसंकल्पात 74 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, प्रदूषण, स्वच्छता यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, मात्र असे असूनही मुंबईकरांच्या नागरी तक्रारींमध्ये घट होण्याऐवजी त्या वाढत आहेत.