
एसटी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातल्याचे उघडकीस येत आहे. एसटी बसेस बांधणीचे काम होत असलेल्या कार्यशाळांतील जवळपास 700 कामगारांच्या अन्य विभागांत बदल्या करण्याचा निर्णय एसटीच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे. कार्यशाळांच्या जागांवर डोळा ठेवून बिल्डरांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. एसटीच्या मूळ अस्तित्वावर घाला घालण्याच्या या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून पुणे-दापोडी, छत्रपती संभाजीनगर-चिकलठाणा आणि नागपूर-हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये भक्कम बसेस बांधणीचे काम केले जात आहे. तिन्ही कार्यशाळांमधून अडीच हजारांपर्यंत कामगारांना रोजगार उपलब्ध होत होता. हे कामगार दरमहा 110 बसेसची बांधणी करीत आहेत. पुणे दापोडी, छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा आणि नागपूर हिंगणा या भागांत वेगाने औद्योगिक प्रगती झाली आहे. या शहरांत एसटी कार्यशाळांसाठी सध्या वापरात असणाऱ्या 84 एकर जमिनी मोडीत निघणार आहेत. खासगीकरण आणि बिल्डरांच्या हितासाठी हा निर्णय घेतला जात आहे.
एसटी महामंडळाला खासगीकरणाचे ग्रहण लावले जात आहे. याचे परिणाम कामगारवर्गाबरोबर राज्यातील जनतेलाही भोगावे लागणार आहेत.
z हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना