
शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र शिक्षक भरतीप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व माजी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. वंजारी हा या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अध्यक्ष होता. या घोटाळय़ात बोगस शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना वेतन मंजूर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, वंजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी असतानाच या घोटाळय़ाला सुरुवात झाली होती, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.
वंजारी हा नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 2024 साली त्याच्याच अध्यक्षतेखाली या घोटाळय़ाच्या तपासासाठी एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीने 12 फेब्रुवारी 2024 रोजी अहवाल सादर केला. यात 580 बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून अपात्र शिक्षकांना वेतन मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणांत 15 एप्रिल रोजी पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, बोगस शिक्षक पराग पुडके, सूत्रधार नीलेश मेश्राम, संजय दुधाळकर आणि सूरज नाईक या पाच जणांना अटक केली होती. हे सर्व आता जामिनावर आहेत.
पारधी याच्या तपासात पुढे आले वंजारीचे नाव
पोलिसांनी बुधवारी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी आणि मुख्य आरोपी लक्ष्मण मंघाम यांना अटक केली होती. पारधी याने तपासादरम्यान वंजारी याचे नाव घेतल्याने त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यत एपूण 13 जणांना अटक करण्यात आली असून पारधीसह सहा जणांना जामीन मिळाला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे गोरखधंदा
नागपूर जिह्यातील विविध शाळांमध्ये 2019 पासून बोगस प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याची माहिती समोर आली होती. सध्या नागपूर जिह्यात जवळपास 580 अशा बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल करून सरकारला कोटय़वधीचा चुना लावण्यात आला आहे.
माजी महिला अधिकाऱ्याला अटक
नागपूर विभागीय माजी उपसंचालक वैशाली जामदार यांना आज अटक करण्यात आली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देणे, मान्य ठरावामध्ये फेरबदल करून खोटे नियुक्तीपत्र देणे, खोटे रुजू अहवाल आणि खोटय़ा व बनावट नियुक्त्या, पदोन्नती दाखवून सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. प्रथम त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. जामदार या उल्हास नरड यांच्या आधी नागपूरच्या विभागीय उपसंचालक होत्या.



























































