आपल्या पक्षाचे संघटन व एकीच्या बळाचा ठसका अनेकांनी घेतलाय आणि आजही अनेकजण घेत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

आपल्या पक्षाचे संघटन व एकीच्या बळाचा ठसका अनेकांनी घेतलाय आणि आजही अनेकजण घेत आहेत, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. अवसरी फाटा येथे संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

शिवसेनेची ताकद आजही शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघात स्वतःची परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी हवी. आम्ही आघाडी धर्म पाळणार आहोत, मात्र राजकारण चंचल असून ते कोणत्या वळणावर नेईल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष व मशाल चिन्ह घरोघर पोहचवण्यासाठी रान उठवावे, असे आवाहन यावेळी खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी फुटून नेते एकमेकांना सोडून गेले तरी ते एकमेकांच्या बाजूला बसतात एकमेकांचे आशीर्वाद घेतात. मात्र आम्ही शेजारीही बसत नाही. एक तर सत्ताधारी माझ्यासमोर येत नाही अथवा बाजूने जात नाही. आमच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत गद्दारांमध्ये नाही, असे सांगून राऊत म्हणाले. शिवसेने शिवाय निवडून येणार नाही, याचे भान आघाडीला आहे. आम्ही आघाडी धर्म पाळणारे आहोत. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर शरद पवार यांनाही नेते मानतो. मात्र राजकारण चंचल असल्याने राजकारण कधी कोणत्या वळणावर जाईल सांगता येत नाही. त्यासाठी सदैव जागरूक राहावे. शिवसेनेत ज्यांना काही मिळाले नाही ते 99 टक्के शिवसैनिक आजही पक्षाबरोबर निष्ठेने आहेत. मात्र ज्यांना सर्व काही दिले ते कधीच पक्षासोबत राहिले नाही. अशी टीका त्यांनी मिंधे गटावर केली.

आपल्याला सोडून गेलेले सत्तेच्या मस्तीत आहेत. सत्ताधाऱ्यांबरोबर हात मिळवणी केली की, लोक बरोबर येणार नाही. त्यासाठी सत्ताधाऱ्या विरोधात आवाज उठवा, आंदोलन ही शिवसेनेची ओळख असून कार्यकर्त्यांनी आंदोलनाची तयारी केली पाहिजे, असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांची भाषणे ऐकली. त्यातनं एक जाणवले आत्ताच्या घडीला सुद्धा आंबेगावचा शिवसैनिक लढायला तयार आहे. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अजूनही चांगले आहे, हे मागील लोकसभा व विधानसभेत दिसून आले आहे. हीच ताकद अजून वाढली वाढली पाहिजे. पक्षाचे संघटन वाढले पाहिजे. आपल्या पक्षाचे संघटन व एकीच्या बळाचा ठसका तेव्हा अनेकांनी घेतलाय आणि आजही अनेक जण घेत आहेत. आंबेगाव मतदारसंघात आपण आपल्या पक्षाची एकदा परीक्षा घ्यावी. असे आता वाटत आहे. या मतदारसंघात आपण लोकसभा विधानसभा आपण लढवत नाही, या मानसिकतेतून बाहेर पडा, कधी कोणत्या निवडणुकीला लढायची वेळ येईल. हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली.

आमदार सचिन अहिर म्हणाले, सन्मानाने बरोबर घेतले तर आम्ही आघाडी सोबत राहणार आहोत, नाहीतर स्वबळाची तयारी करावी लागेल. सक्षम विरोधक म्हणून तालुक्यात काम करा, अशी सूचना त्यांनी केली. तालुक्यात एकदिवशीय शिबिर घेणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले येत्या पंधरा दिवसात गाव तेथे शिवसेना शाखा फलक लावून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. शिवसैनिकांनी गटबाजी विरहित काम करावे. राजाराम बाणखेले म्हणाले खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाले आहेत. इच्छा नसतानाही तुतारीचा प्रचार करून मतदान करावे लागले. विधानसभा, लोकसभेला आघाडीसाठी काम करावे लागले आपली ताकद येथे असल्याने कार्यकर्त्यांना संधी द्यावी. भोलेनाथ पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार बाबाजी काळे, आंबेगाव संपर्कप्रमुख मंगल राऊत, नंदकुमार बोऱ्हाडे, सचिन निघोट, कलावती पोटकुले, विकास जाधव, भरत मोरे, अरुण बाणखेले, महेश घोडके, अमोल बाणखेले, दत्ता निघोट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रवीण टेमकर यांनी तर सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी आभार मानले.