जीभेवर ताबा ठेवा, मोदींच्या नेते-मंत्र्यांना कानपिचक्या

ऑपरेशन सिंदूरवरून विविध प्रकारची आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्लास घेतला. नेत्यांनी, मंत्र्यांनी जीभेवर ताबा ठेवावा आणि अनावश्यक विधाने करणे टाळावे. कुठल्याही प्रकारचे विधान करण्यापूर्वी विचार करा आणि विचारपूर्वक बोला, अशा शब्दांत त्यांनी भाजप मंत्री, नेत्यांना सुनावले. एनडीएच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची त्यांनी बैठक घेतली. बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

बैठकीत सुरक्षा दलांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करण्यात आले. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आणि हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावात पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युतर देताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विजय शहा, रामचंद्र जांगडा, जगदीश देवडा या भाजप नेते आणि मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधाने करून हिंदुस्थानी लष्कराचा तसेच माता आणि भगिनींचा अवमान केल्यामुळे मोदी सरकारवर जगभरातून जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी भाजपला अक्षरशः धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सरकारविरोधात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मोदींनी आज आपत्कालीन बैठक घेऊन सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप नेते आणि मंत्र्यांना फैलावर घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

एनडीएची बैठक, पण भाजपा पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नाहीच

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले असले तरी तिसऱ्या टर्म वेळी मोदींच्या गाठीशी पुरेसे बहुमत नाही. त्यामुळे चंद्राबाबू व नितीश कुमार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मोदींनी पंतप्रधान पद मिळवले. गमतीचा भाग म्हणजे मोदींची भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडही झाली नाही. तशी बैठकच मोदींनी घेतली नाही. त्याऐवजी स्वतःला एनडीएचा नेता म्हणून घोषित केले. मोदींची तिसरी टर्म सुरू झाल्यापासून एकदाही भाजपाची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झालेली नाही हे विशेष.