
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले खरे मात्र न्यूयॉर्क येथे पत्रकार परिषदेत बोलताना थरूर यांनी मोदींचेच सिव्रेट उघड केले. पठाणकोट हल्ल्याच्या महिनाभर आधी डिसेंबर 2015 मध्ये मोदी पाकिस्तानला गेले होते. त्यांनी नवाझ शरीफ यांच्यापुढे मैत्रीचा हात केला होता. पठाणकोट हल्ल्यानंतरही चौकशीसाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला त्यांनी निमंत्रित केले होते, असे थरूर म्हणाले.
25 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बर्थडे सेलिब्रेशनही केले. मात्र, त्यानंतर महिनाभरातच पठाणकोट येथील लष्कराच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मोदींना प्रचंड आश्चर्य वाटले. त्यांनी थेट शरीफ यांना फोन केला आणि हल्ल्याच्या चौकशीत तुम्ही सहकार्य का करत नाही, हल्ला कुणी केला ते शोधून काढू. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयलाही त्यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विनंती केली. परंतु, पाकिस्तानने हा प्रस्ताव नाकारला, असे थरूर म्हणाले. आम्ही दहशतवादाशी लढत असल्याचा सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला तेव्हा शेवटची संधी होती, असेही थरूर म्हणाले.
मी सरकारसाठी काम करत नाही
तुम्ही सरकारसाठी काम करताय का असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता मी सरकारसाठी काम करत नाही. मी विरोधी पक्षात आहे. परंतु, काही दिवसांपूर्वीच माझा लेख प्रसिद्ध झाला होता. यावेळी केवळ मुँहतोड नाही तर हुशारीने उत्तर देणे गरजेचे आहे, असे मी नमूद केले होते. आपण तसे उत्तर पाकिस्तानला दिले, त्याबद्दल मला समाधान आहे, असे थरूर म्हणाले.