धुळ्यातील रोकड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा; भास्कर जाधव यांचे विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र

धुळ्यातील रोकड प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटनेने महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लागले आहे. महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावणारी घटना आहे. विधानसभेचं पावित्र्य हे सर्वांसाठी सर्वोच्च आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणाऱ्या धुळे विश्रामगृहातील कोट्यावधी रुपयांच्या रोकड प्रकरणी विधिमंडळाच्या अंदाज समिती सदस्यांवर झालेल्या गंभीर आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करणेबाबत..महोदय, महाराष्ट्र विधिमंडळाला देशात आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने राष्ट्राला दिले आहेत, ज्यांनी आपल्या महान कर्तृत्वा‌द्वारे आणि सर्वकष कामगिरीने या विधिमंडळाला उच्चस्तर व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. परंतु, विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील विश्रामगृहातील एका खोलीमध्ये १ कोटी ८५ लाखांची रोकड आढळून आली. याहीपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आलेली होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पण, ज्या खोलीत रोकड आढळून आली ती खोली अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार श्री. अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावावर आरक्षित होती. ही रक्कम समितीतील सदस्यांना देण्यासाठी विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप केला जात आहे, ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणारी आहे, असे मला वाटते.

ही बाब केवळ धक्कादायकच नाही, तर महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावणारी आहे. विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असलेल सर्वोच्च व्यासपीठ आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्याचा वापर एका “डील”च्या माध्यमासारखा करण्यात येतोय, ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही आमदाराने, समिती सदस्याने किंवा शासकीय कर्मचाऱ्याने अशा प्रकारच्या गैरप्रकारात सहभाग घेतला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. परंतु जर यामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर करून विशिष्ट हेतूने बदनामीचे राजकारण सुरु असेल, तर तीसुद्धा निषेपार्ह गोष्ट आहे.

विधानसभा असो वा विधानपरिषद दोन्ही सभागृहांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही प्रथा परंपरा आहेत, ज्यामुळे एक वेगळेपण जपणारे आदर्शवत विधिमंडळ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाने आपली ओळख जपली होती. परंतु, मागच्याच अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनीच अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत ते सांगा, अशी विचारणा केली. त्याचबरोबर विधिमंडळात प्रवेशपास मिळवून देण्यासाठी दहा-दहा हजार रुपये घेतले जातात, हे प्रसारमाध्यमांनीच समोर आणले. हे सारे या गौरवशाली विधिमंडळात घडत आहे, याचे गेली ३० वर्षांहून अधिक काळ लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात म्हणजेच विधिमंडळात येणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला पाहावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैव नाही.

विधानसभेचं पावित्र्य हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. म्हणूनच माझी आपल्याकडे मागणी आहे की, धुळ्यातील या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी तातडीने सुरू करण्यात यावी, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्याबाबत सर्व व्यवहारांची पारदर्शक माहिती विधानसभेसमोर मांडण्यात यावी, व त्यातील दोर्षीवर कठोर कारवाई करण्यात यावी. आपण या प्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई कराल, अशी अपेक्षा आहे. असे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.