
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर टीकात्मक पोस्ट शेअर केल्यानंतर पुण्यात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणावरून या विद्यार्थिनीला महाविद्यालयातून देखील काढून टाकण्यात आलं. याचप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत खडेबोल सुनावले आहेत. तसेच याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थिनीने तिच्या याचिकेत महाविद्यालयातून काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. तसेच ही महाविद्यालयाची मनमानी असून हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. या विद्यार्थ्याला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. ही विद्यार्थिनी पुण्यातील सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले एक खाजगी महाविद्यालय आहे.
न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, केवळ काहीतरी लिहिण्याच्या आधारावर विद्यार्थिनीला अटक करू शकत नाही. महाविद्यालयाला खडेबोल सुनावत न्यायमूर्ती गोडसे म्हणाल्या की, “हे काय आहे? तुम्ही एका विद्यार्थिनीचे आयुष्य उध्वस्त करत आहात? हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे? जर कोणी काही बोलले तर तुम्ही एका विद्यार्थिनीचे आयुष्य उध्वस्त कराल? तुम्ही तिला कसे बाहेर काढू शकता? तुम्ही तिला स्पष्टीकरण मागितले का?”
न्यायाधीश म्हणाल्या, “शैक्षणिक संस्थेचा उद्देश काय आहे? ती फक्त शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण देण्यासाठी आहे का? तुम्हाला विद्यार्थ्यांना काहीतरी बनवायचे आहे की, त्यांना गुन्हेगार बनवायचे आहे? आम्ही समजू शकतो की, तुम्हाला काही कारवाई करायची आहे, परंतु तुम्ही तिला परीक्षा देण्यापासून रोखू शकत नाही. तिला उर्वरित तीन पेपर देऊ द्या.”
काय आहे प्रकरण ?
पुण्यातील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी या विद्यार्थिनीने 7 मे रोजी इन्स्टाग्रामवर केंद्र सरकारवर टीका करणारी एक पोस्ट रीपोस्ट केली होती. ही पोस्ट हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणि ऑपरेशन सिंदूर यांच्याशी संबंधित होती. ऑनलाइन धमक्या मिळाल्यानंतर तिने दोन तासांतच ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली. तरीही 9 मे रोजी तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली आणि तिला अटक करण्यात आली होती. तसेच याप्रकरणावरून या विद्यार्थिनीला महाविद्यालयातून देखील काढून टाकण्यात आलं होतं.