
भाजप-मिंधे सरकारच्या सत्ताकाळात सत्ताधाऱयांकडूनच मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अवमान होण्याच्या घटना सुरूच असून आता खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी, ‘हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनलीय’ असे संतापजनक वक्तव्य केले आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे. त्यामुळे आम्ही 237 जागांवर निवडून आल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रवासीयांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
परिवहन मंत्री मुंबईत एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ठाणे-भाईंदर माझा मतदारसंघ आहे. ठाण्यात जनतेशी ज्यावेळी मी बोलतो तेव्हा मी शुद्ध मराठीत बोलतो. तर मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश करताच माझ्या तोंडून हिंदी भाषाच निघते. मराठी ही आमची मातृभाषा, आमची आई असली तरी हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे.’
दरम्यान, मिंधे-भाजप सरकारच्या काळात मराठी कुटुंबांना परप्रांतीयांकडून मारहाण, मांसाहारी असल्याने घर नाकारण्याचे प्रकार वारंवार घडत. मात्र सरकारकडून मराठी माणसाच्या सन्मानासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. आता तर खुद्द मंत्र्यांकडूनच मराठीला सापत्न वागणूक आणि हिंदी भाषेचा उदोउदो केला जात असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
ही तर मतांसाठी लाचारी
मंत्री सरनाईकांच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेसह काँग्रेस आदी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मतांच्या लाचारीसाठी मिंधे आमदारांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे पक्षाने अशा नेत्यांना आवरावे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
असे बरळले…
हिंदी ही आपल्या मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मुंबईसारखी कुठेही हिंदी शुद्ध नसेल. हिंदी बोलताना मध्येच एखादा शब्द इंग्रजी किंवा मराठीत येतो. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, मात्र आमच्या तोंडी कधी हिंदी तर कधी इंग्रजी भाषा येते. त्यामुळेच हिंदी ही आपली बोलीभाषा झाली आहे.






























































