
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील कटाबा काउंटीमधील हिकोरी शहरात रविवारी मध्यरात्री 12:45 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिकोरी शहरातील वॉलनट एकर्स ड्राइव्ह येथील एका घरात ही घटना घडली. या गोळीबाराची चौकशी नॉर्थ कॅरोलिना स्टेट ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि हिकोरी पोलीस विभाग संयुक्तपणे करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनास्थळावरील तपास कार्य सुरू असून, गोळीबारामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
हा गोळीबार एका पार्टीदरम्यान झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, जिथे 100 हून अधिक लोक उपस्थित होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.




























































