बेकायदा फेरीवाल्यांनी फुटपाथ गिळले; दिव्यात महानगरपालिकेचे दुर्लक्ष

बेकायदा बांधकामाचे माहेरघर असलेल्या दिव्यात आता अनधिकृत फेरीवाल्यांनी फुटपाथ गिळले असल्याचे समोर आले आहे. बेकायदा फेरीवाल्यांनी फुटपाथवर बिनधास्तपणे कब्जा करून हातगाडी, स्टॉल उभारून बस्तान मांडले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना चालायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे.

बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. मुंब्रादेवी कॉलोनी येथील स्थानिक नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दातिवली शाखेला भेट देत फुटपाथवर चालण्यासाठी जागा नसल्याची समस्या मांडली. यावेळी विधानसभा संघटक योगिता नाईक यांनी तत्काळ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत फेरीवाल्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान सहाय्यक आयुक्तांनी दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.

हप्ता, वसुली असल्याने फेरीवाले शेफारले
फेरीवाल्यांनी फुटपाथवर खुलेआम मासे, भाजीच्या हातगाड्या, भांड्याची दुकाने थाटली आहेत. यामध्ये परप्रांतीय फेरीवाले आघाडीवर पालिका कर्मचाऱ्यांना हप्ता पुरवला जात असल्याने फेरीवाले शेफारले असल्याचा आरोप विधानसभा संघटक योगिता नाईक यांनी केला आहे.