
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर 24 तासांनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनेत गुन्हेगारी निष्काळजीपणाचा उल्लेख आहे.
आरसीबीने 3 जून रोजी पहिले आयपीएल जेतेपद जिंकले, त्यानंतर संघाच्या विजय परेडची चर्चा सुरु झाली. 4 जून रोजी सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी जमू लागली. एकूणच गर्दी पाहता पोलिसांनी विजय परेडला परवानगी दिली नाही आणि ती रद्द करण्यात आली. पोलिसांनी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारा सोहळा पुढे ढकलण्याची विनंतीही केली होती. संघाने एक दिवसापूर्वीच ट्रॉफी जिंकल्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या खूप उत्साह आहे असे पोलिसांचे मत होते.
आरसीबीने हा कार्यक्रम रविवारी (8 जून 2025) आयोजित करावा असे पोलिसांनी सांगितले होते. परंतु आरसीबीने असा युक्तिवाद केला की, त्यांचे परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परततील. म्हणून त्यांना हा कार्यक्रम 4 जून रोजीच आयोजित करायचा आहे. बंगळुरू शहरी उपायुक्त जी जगदीशा यांनी यापूर्वी सांगितले होते की, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पोलिस आयुक्त बी दयानंद यांना चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीत सामील होण्यासाठी नोटीस बजावल्या जातील.
बुधवारी जिथे चेंगराचेंगरी झाली होती त्या चिन्नास्वामी स्टेडियमची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाहणी केली. बुधवारी (4 जून 2025) बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण जखमी झाले.