इराणचा इस्रायलमधील रुग्णालयावर हल्ला, 47 जण जखमी; नेतन्याहू म्हणाले मोठी किंमत चुकवावी लागेल

इराणने इस्रायलमधील एका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 47 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे.

19 जूनच्या सकाळी दक्षिण इस्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली मीडियाने शेअप केलेल्या काही दृश्यानुसार रुग्णालयाच्या इमारतीच्या खिडक्या स्फोटांमुळे उडाल्या आहेत. तसेच आतून काळा धूर निघताना दिसतोय. इमारतीच्या आत अफरातफरीचं वातावरणही दिसत आहे.

इस्रायलच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या घटनेची एक व्हिडीओ क्लिप देखील शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओत रुग्णालयातील कर्मचारी धुराने भरलेल्या कॉरिडॉरमधून धावताना दिसतात, तर काचांचे तुकडे जमिनीवर विखुरलेले आहेत. तुटलेल्या खिडक्या, बाक आणि खुर्च्यांचे अवशेष सर्वत्र पसरलेले आहेत. या व्हिडीओत रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण रडताना आणि किंचाळताना दिसतात.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत एक्स अकाऊंट ‘स्टेट ऑफ इस्रायल’ ने लिहिले की, ”इराणी सरकारने बॅलिस्टिक मिसाईलने सोरोका रुग्णालयावर थेट हल्ला केला आहे. आम्ही शांत बसणार नाही. आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी जे काही करावे लागेल, ते आम्ही करत राहू.”

पंतप्रधान नेतान्याहू यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, “१९ जूनच्या सकाळी इराणमधील ‘दहशतवादी हुकूमशहा’ यांनी बीरशेबा येथील सोरोका रुग्णालयावर आणि सेंट्रल इस्रायलमधील नागरी भागांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.”

सोरोका रुग्णालयाव्यतिरिक्त इराणने तेल अवीवमधील एक बहुमजली इमारत आणि इतर काही भागांवरही हल्ला केला. या हल्ल्यात आणखी 16 जण जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर तेल अवीवच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.