ऑक्सिओम-4 मिशनला अखेर मुहूर्त मिळाला, शुभांशू शुक्लांचे आज ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून उड्डाण

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ऑक्सिओम-4 हे मिशन आज 25 जूनला ड्रगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळात उड्डाण करणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन सलग सहावेळा लांबणीवर पडले आहे, परंतु आता या मिशनची नवीन तारीख 25 जून ठरवण्यात आली आहे. हे उड्डाण आज बुधवारी भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.01 वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येईल. 25 जूनला उड्डाण केल्यानंतर 26 जून रोजी दुपारी साडेचार वाजता त्याचे डॉकिंग होईल, असे नासाकडून सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळावर 14 दिवसांसाठी जाणार आहेत. या मोहिमेत चार देशांतील चार अंतराळवीरांचा समावेश आहे.

रक्तातील साखरेवर संशोधन

ऑक्सिओम-4 मोहिमेमुळे मधुमेहाच्या रुग्णांना अंतराळात प्रवास करण्यासाठी आशेचा किरण मिळाला आहे. कारण यूएईची आरोग्य सेवा प्रदाता बुर्जील होल्डिंग्ज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ग्लुकोजच्या वर्तनावर संशोधन करत आहे. शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीर कक्षीय प्रयोगशाळेत 14 दिवस सतत ग्लुकोज मॉनिटर्स घालतील. तसेच अंतराळवीर त्यांच्यासोबत इन्सुलिन पेनदेखील घेऊन जातील, जे वेगवेगळ्या तापमानात ठेवले जातील, जेणेकरून सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा इन्सुलिन रेणूंवर काय परिणाम होतो हे पाहता येईल. इन्सुलिन घेणाऱया मधुमेहींना अंतराळात जाण्याची परवानगी देत नाही. इन्सुलिन न घेणाऱया मधुमेहींवर अधिकृत बंदी नसली तरी अद्याप कोणत्याही मधुमेही अंतराळवीराने अंतराळात प्रवास केलेला नाही.

आजचा मुहूर्त खरा ठरो

ऑक्सिओम-4 मिशनची मोहीम एकदा दोनदा नव्हे, तर सलग सहा वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नासाकडून उद्याची तारीख फिक्स केली असली तरी ऐनवेळी ती रद्द होण्याची भीती जास्त आहे. आजचा उड्डाणाचा मुहूर्त खरा ठरो अशी भावना अनेकांची आहे.