
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या पाऊलखुणा आता जे. जे. रुग्णालयात उमटणार आहेत. रुग्णालयात नाना शंकरशेट यांचे तैलचित्र ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात विराजमान होणार आहे.
मुंबईच्या विकासात नाना शंकरशेट आणि जमशेदजी जीजीभॉय यांचे मोलाचे योगदान होते. अठराव्या शतकात मुंबईकरांच्या रुग्णसेवेसाठी रुग्णालय उभारण्याची योजना जमशेदजी जीजीभॉय आणि नाना शंकरशेट यांनी आखली. या रुग्णालयास जीजीभॉय यांच्याप्रमाणेच नाना शंकरशेट यांनी भरीव आर्थिक निधी दिला. जीजीभॉय यांच्या निधनानंतर या रुग्णालयास त्यांचे नाव देण्यात आले, परंतु या रुग्णालयाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या नावाचा या रुग्णालयात कुठेही उल्लेख नाही. ही बाब लक्षात घेऊन नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी जे.जे.च्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. छाया वळवी यांची भेट घेतली. नानांच्या या रुग्णालयाच्या उभारणीतील माहिती देतानाच रुग्णालयात नानांचे तैलचित्र लावावे असे निवेदन दिले. त्यास डॉ. वळवी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.