कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार, पुनर्विकासासाठी दोन विकासक इच्छुक; 8 हजार रहिवाशांना मिळणार प्रशस्त घरे

दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार आहे. कामाठीपुराचा पुनर्विकास करण्यासाठी रेमंड रियालिटी आणि अशदान प्रॉपर्टीज प्रा. लि. हे दोन विकासक इच्छुक असून, शुक्रवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या निविदापूर्व बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. कामाठीपुराच्या पुनर्विकासातून 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार असून 800 जमीनमालकांनाही योग्य मोबदला दिला जाणार आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा येथील 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीनमालक आहेत. या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. संपूर्ण विभागातील भूखंडाचे क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरीत्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी म्हाडाने 12 जून रोजी निविदा जाहीर केली होती.

म्हाडाला लॉटरीसाठी घरे मिळणार

या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाला 44 हजार चौ. मी. क्षेत्र निविदाधारकांमार्फत उपलब्ध होणार असून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडाला मोठय़ा प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकाला 5,67,000 चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे 4500 घरे उपलब्ध होणार आहेत.