
चेन्नई आणि मदुराई येथे यावर्षी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत यजमान हिंदुस्थान व पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांना एकाच ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे. या गटात चिली आणि स्वीत्झर्लंड या संघांचाही समावेश आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ शनिवारी एफआयएच मुख्यालयात जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम हे हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग आणि हॉकी इंडियाचे महासंचालक आर. के. श्रीवास्तव यांच्यासह ड्रॉ समारंभाला उपस्थित होते. पहिल्यांदाच या टप्प्यात २४ संघ सहभागी होतील. गट ‘अ’मध्ये जर्मनी, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि आयर्लंड, तर गट ‘क’मध्ये अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान आणि चीन या संघांचा समावेश आहे. ‘ड’ गटामध्ये स्पेन, बेल्जियम, मिस्र आणि नामिबिया, तर ‘ई’ गटात नेदरलँड, मलेशिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि बांगलादेश गट ‘फ’ मध्ये आहेत.
आम्ही पहिल्या 24 संघांच्या एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या दिशेने प्रवास सुरू करीत आहोत, ही खूप आनंदाची बाब आहे. उदयोन्मुख राष्ट्रांसह सर्व देशांच्या तरुणांना सक्षम बनविण्याच्या एफआयएच धोरणाचा हा एक भाग आहे आणि ही स्पर्धा या दिशेने पहिले पाऊल असेल, असे इकराम यांनी एका निवेदनात म्हटले आहे.