
भूप्रक्षोभक हालचालीमुळे जगात एक नवीन महासागर तयार होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. शास्त्रज्ञांना आफ्रिका खंडात जमिनीच्या खोलवर हालचाल आढळून आली आहे. अगदी हृदयांच्या ठोक्यांसारखी ही हालचाल आहे. ही हालचाल हळूहळू आफ्रिका खंडाला दोन तुकड्यांमध्ये वेगळे करीत असल्याचेदेखील शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. हे नव्या महासागराच्या जन्माचे संकेत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
नक्की पृथ्वीच्या आत काय सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांच्या गटाने अफार प्रदेश आणि मुख्य इथिओपियन रिफ्टमधून ज्वालामुखीच्या खडकाचे 130 हून अधिक नमुने गोळा केले आहेत. त्यांनी पृष्ठभागाखालील कवच आणि आवरण यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यमान डेटा व प्रगत सांख्यिकीय मॉडेल्सचादेखील वापर केला. या अभ्यासाअंती शास्त्रज्ञांनी नवीन महासागराच्या निर्मितीचा निष्कर्ष काढला आहे.
अभ्यास काय सांगतो?
ज्या भागात टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात, तिथे जमीन पसरते आणि ती पातळ होत जाते. ही जमीन तुटून एक नवीन महासागराचे खोरे तयार करू शकते. लाखो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका अशाच प्रकारे विभक्त झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
साऊथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांना इथिओपियाच्या अफार प्रदेशात खोलवर एक स्थिर वस्तू आढळून आली आहे, जी अगदी माणसाच्या हृदयासारखी धडधडत आहे.
ही वस्तू मॅग्मामुळे खालून धडधडत आहे. कालांतराने यामुळे हळूहळू खंडाचे विभाजन होत आहे आणि एक दरडही तयार झाली आहे. त्यामुळे एक नवीन महासागर तयार होऊ शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.