
मुंबई मेट्रो लाईन-2 वरील बांगुरनगर स्थानकात रविवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. मेट्रो ट्रेनमध्ये चढलेल्या कुटुंबातील 2 वर्षांचा मुलगा अचानक प्लॅटफॉर्मवर आला व तितक्यात मेट्रोचा दरवाजाही बंद झाला. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत चालकाला मेट्रो थांबवण्यास सांगितले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मुंबई मेट्रोच्या येलो लाईनवर प्लॅटफॉर्मवर स्वयंचलित गेटदेखील बसवण्यात आले आहेत. मेट्रोचे दरवाजे आणि स्वयंचलित गेट एकाचवेळी बंद होतात.
रविवारी सायंकाळी बांगुरनगर स्थानकात एका कुटुंबाने मेट्रो ट्रेन पकडली होती. निर्धारित वेळेत मेट्रोचे दरवाजे बंद होण्याच्या काही क्षण आधी कुटुंबातील मुलगा अचानक प्लॅटफॉर्मवर आला. तो मदतीसाठी कुटुंबीयांना आवाज देत होता. कुटुंबीयांचे त्याच्याकडे लक्ष जाण्याआधीच संकेत चोडणकर या सुरक्षा कर्मचाऱ्याने चालकाला मेट्रो थांबवण्यास सांगून मुलाकडे धाव घेतली. त्यानुसार चालकाने मेट्रो थांबवून दरवाजे उघडल्याने लहानग्याला ट्रेनमध्ये जाता आले. सुदैवाने लहान मुलाचा हात प्लॅटफॉर्मवरील स्वयंचलित गेटमध्ये अडकण्यापासून वाचला. हा सर्व प्रकार मेट्रो स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून अलर्ट मेट्रो कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे.