
शालेय मुलांवर हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न करणारे फडणवीस सरकार शासकीय कागदपत्रांमध्ये दररोज मराठी भाषेच्या चुका करीत आहे. परिवहन विभागाने सोमवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिह्यांचाही नीट उल्लेख केला नाही. त्यातून फडणवीस सरकारचे मराठी व्याकरण फारच कच्चे असल्याचे उघड झाले. याद्वारे सरकार जाणूनबुजून मराठीचा अवमान करीत असल्याची टीका होत आहे.
राज्य सरकारकडून मराठी भाषेची मुस्कटदाबी सुरू आहे. मिंधे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील परिवहन विभागाने सोमवारी एसटीच्या आगाऊ आरक्षणासाठी सवलतीचे दरपत्रक जाहीर केले. त्यात मराठी व्याकरणाच्या अनेक चुका करण्यात आल्या. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ नाव दिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिह्याचेही नाव नीट लिहिले नाही. संभाजीनगरऐवजी ‘संभातीनगर’ अशी चूक केली. मुख्यमंत्र्यांच्या ‘नागपूर’मध्येही चुका केल्या. मराठी आकडे टाळून इंग्रजी आकड्यांची घुसखोरी केली. हा मराठी भाषा वाचवण्याचा प्रयत्न की भाषेची गळचेपी करण्याचे षडयंत्र आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.