सफाई कर्मचाऱ्यांची संख्या 60 हजारांपर्यंत वाढवा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची पालिकेकडे मागणी

मुंबई महापालिकेची कार्यकक्षा काळानुसार वाढत गेली आणि पश्चिम उपनगरात मुंबई बोरिवलीपर्यंत तर पूर्व उपनगरात मुंबई मुलुंडपर्यंत पसरली. सध्या मुंबईची लोकसंख्या सवा दोन कोटींच्या आसपास गेली आहे. मात्र, या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या मुंबईत केवळ 28 हजार 36 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत, तर तब्बल 3 हजार 581 पदे रिक्त आहेत. साल 1981 मध्ये 31 हजार 617 सफाई कर्मचारी होते आणि आजही सफाई कर्मचाऱ्यांची एवढीच संख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या किमान 60 हजारांपर्यंत वाढवावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

सफाई कामगारांच्या मागण्यांसंदर्भात मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता प्रशांत पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढलेल्या लोकसंख्येनुसार कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेसाठी कर्मचारी संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याची मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली. दरम्यान, याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी चिटणीस संजय वाघ, रामचंद्र लिंबारे, महेश गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रिक्त पदे भरणार

घनकचरा व्यवस्थापन खात्यातील पर्यवेक्षीय संवर्गातील रिक्त असलेली कनिष्ठ पर्यवेक्षक (105), सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक (20) आणि उपमुख्य पर्यवेक्षक (4) ही पदे तत्काळ भरण्याचे आश्वासनही पालिका प्रशासनाने दिले. याशिवाय सफाई विभागातील चौक्यांचे नूतनीकरण, पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालये, चेंजिंग रूम या सुविधा पुरवण्यात येणार आहे.

चैत्यभूमीवर मॉडेल चौकी

दादर येथील चैत्यभूमीवरील सफाई चौकी सर्व सुविधांनी युक्त अशी ‘मॉडेल चौकी’ म्हणून विकसित करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक कामकाजाचा तसेच प्रलंबित पीटी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी लिपिक संवर्गातील 145 रिक्त पदेही भरली जाणार आहेत.