
>> उमेश पोतदार, नातेपूते
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आज सोलापूर जिह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. येथे तोफांच्या सलामीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी ।
वाट ती चालावी पंढरीची ।।
या संत वचनानुसार टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखाने ‘जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा… तुकाराम’चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱयाच्या चेहऱयावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.
आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगच्या भेटीला निघालेल्या माउलींच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिह्यात सकाळी 10. 05 मिनिटांनी उत्साहात आगमन झाले.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱयांच्या चेहऱयावर समाधान दिसत होते. संतांच्या अंभगाच्या ओवी म्हणत वारकरी भाविक भक्तीरसात न्हाऊन गेले होते. विविध रंगाची व सुंदर फुलांनी सजवलेल्या रथापुढे पुढे मानाच्या सत्तावीस दिंडया, तर रथाच्या मागे साडतीनशे दिंडया उत्साहात पुढे सरकत होत्या. पालखी मार्गक्रमण करताना प्रत्येक जण दर्शनासाठी पुढे जाऊन दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पहात होता.
सोलापूर जिह्यातील पालखी प्रवेशानंतर माउलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. धर्मपुरी येथे पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.
धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिह्यातील पहिल्या मुक्कामासाठी माउलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माउलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगारा व अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
वारकऱयांसाठी विविध सुविधांचे उद्घाटन
आषाढी वारी कालावधीत ग्रामविकास विभागामार्फत धर्मपुरी येथे ग्रामविकास विभागाने वारकरी सेवा मसाज केंद्र, वैद्यकीय सेवा कक्ष, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, मोफत मोबाईल चार्ंजग पॉइंट, 108 रुग्णवाहिका सेवांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप
सोलापूर जिह्यात माउलींच्या पालखीचे सकाळी 10 वाजता धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱयांसह नागरिकांनी माउलींच्या पालखीला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला.