कशेडी घाटात महामार्गाला भेगा

पोलादपूर-मुंबई-गोवा महामार्गाला कशेडी घाटात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा जुन्या मार्गावर आहेत. जुन्या मार्गाच्या खालील बाजूला नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोगावच्या हद्दीत घडलेला हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कळवले. त्यानुसार तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीने कशेडी घाटाला भेट देऊन महामार्गाची पाहणी केली. याप्रसंगी पळचील ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते. भेगा पडलेला रस्ता खचल्यास नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने महामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी स्थानिक रहिवाशांनी केली.