
इराणसोबत झालेल्या युद्धबंदीनंतर आता इस्रायलने गाझापट्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे मध्यपूर्वेकडील देशांमध्ये अद्यापही अशांतता आहे. इस्रायलने गाझापट्टीवर सोमवारी जोरदार हवाई हल्ले चढवले असून, कमीत कमी 60 जणांचा बळी गेला आहे. गेल्या काही आठवड्यांतील हे सर्वात मोठे हल्ले मानले जात आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने युद्धबंदीसाठी नव्याने चर्चा सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
‘गाझासंदर्भात करार करा, बंदिवानांना परत आणा’, असे आवाहन ट्रम्प यांनी केले. त्यानंतर इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर हे अमेरिकेत रवाना झाले आहेत. ते अमेरिकेत इराण व गाझासंबंधी चर्चा करणार आहेत.
तसेच प्रत्यक्षात गाझामध्ये सुरू असलेला हिंसाचार शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या उत्तरेकडील भागांतील नागरिकांना स्थलांतराचा सल्ला दिलेला आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर विस्थापन सुरू झाले आहे.
गाझा शहरातील 60 वर्षीय साला म्हणाल्या की, ‘एकापाठोपाठ स्फोट सुरू होते. त्यामध्ये शाळा आणि घरे उद्ध्वस्त झाली. हल्ला इतका भयंकर होत की जमीनही हादरली, जणू भूकंपच झाला आहे’.
गाझा शहरातील झैतून उपनगरात इस्रायली टँक घुसले असून, विमानांनी किमान चार शाळांवर बॉम्बहल्ला केला आहे. यापूर्वी त्या शाळांमध्ये लपलेल्या शेकडो कुटुंबांना बाहेर पडण्यास सांगण्यात आले होते.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या हल्ल्यांत झैतूनमध्ये 10, गाझा शहराच्या नैऋत्य भागात 13, तर समुद्रकिनाऱ्यावरील एका कॅफेमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात 22 जण ठार झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
पॅलेस्टिनियन पत्रकारांच्या संस्थेच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत 220 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी उत्तरेकडील गाझामध्ये हमासच्या नियंत्रण केंद्रांवर हल्ले केले आहे. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक काळजी घेतल्याचा दावा देखील इस्रायलच्या लष्कराकडून करण्यात आला आहे.
Israel Launches Intense Airstrikes on Gaza; 60 Killed as US Pushes for Ceasefire
At least 60 people were killed in heavy Israeli airstrikes across Gaza, even as US officials began talks with Israel to push for a ceasefire and hostage deal.