
विदेशात काम करून भारतात पैसे पाठवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात डॉलरमध्ये पगार मिळत असल्याने लाखो रुपयांची कमाई होत आहे. परदेशात राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनी 2024-25 या आर्थिक वर्षात जवळपास 11.60 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. आरबीआयने नुकतीच यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
हिंदुस्थानातील लोक जगातील वेगवेगळ्या देशांत काम करत असून गेल्या दशकभराच्या काळात जगातील सर्वात जास्त रेमिटन्स मिळवण्यात हिंदुस्थान देश अव्वल ठरला आहे. ज्या देशात हिंदुस्थानी लोक राहून पैसे पाठवतात, त्यामध्ये सर्वात जास्त अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूर या तीन देशांचा समावेश आहे. याआधी आखाती देश म्हणजेच सौदी अरब, यूएई, कुवेत आणि कतार यांचा समावेश होता. या ठिकाणाहून भारतात सर्वात जास्त पैसे पाठवले जात होते, परंतु आता या देशांच्या तुलनेत अमेरिका, ब्रिटनचा वाटा वाढला आहे. या देशांत आता कुशल व्यावसायिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या ठिकाणी लोक आयटी, इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत आहेत.
केरळ, तामीळनाडू, पंजाब आघाडीवर
भारतात ज्या राज्यांतून लोक कामासाठी परदेशात गेले आहेत, त्यामध्ये केरळ, तामीळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. केरळमध्ये सर्वात जास्त पैसा विदेशातून पाठवला जातो. या पैशांतून कुटुंबाच्या गरजा, मुलांचे शिक्षण, नवीन घरे बांधणे, छोटे व्यवसाय करणे यासाठी केला जातो. देशाची व्यापार तूट करण्यामध्ये रेमिटन्सची मोठी भूमिका आहे.