
एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची मालिका सुरूच असून आणखी एक विमान एका अपघातातून थोडक्यात बचावले आहे. दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारे एआय187 हे विमान उड्डाण घेतल्यानंतर त्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान सुमारे 900 फूट खाली आले. परंतु वैमानिकाने तत्काळ नियंत्रण मिळवून विमान योग्य उंचीवर आणले आणि प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला.
तब्बल 9 तास 8 मिनिटांच्या उड्डाणानंतर विमान व्हिएन्नामध्ये सुखरूप लॅण्ड झाले. विमानाने पहाटे 2 वाजून 56 मिनिटांनी उड्डाण केले. त्यावेळी दिल्लीत जोरदार वादळ आणि हवामान खराब होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान सुमारे 900 फूट खाली आले. याचवेळी स्टिक शेकर अलार्म वाजू लागला. म्हणजेच कॉकपिटचे कॉलम हलू लागले. वैमानिकाला त्वरित धोक्याची जाणीव झाली. दरम्यान, वैमानिकाने दिलेल्या अहवालात उड्डाणानंतर टब्ल्युलन्समुळे धोक्याची सूचना मिळाली नव्हती. परंतु डीजीसीएने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्लाइट डेटा रेकॉर्डरची तपासणी केली व पुढील अनर्थ टळला.